अशी सापडली शेरनाझ!

स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’मध्ये शिविका तनेजा

स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेत शेरनाझच्या एंट्रीनं कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र, शेरनाझच्या भूमिकेसाठीची निवड प्रक्रिया फारच गमतीशीर होती. बराच काळ शोध घेतल्यानंतर शेरनाझच्या भूमिकेसाठी शिविका तनेजाची निवड झाली. ग्लॅमरस असलेली शिविका ही भूमिका साकारते आहे.


मालिकेचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि टीम शेरनाझच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. जवळपास २०पेक्षा जास्त अभिनेत्रींची या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली. मात्र, कुणीही पसंत पडेना.
एके दिवशी अचानकपणे या भूमिकेसाठी इच्छुक असलेली शिविका नकुशीच्या सेटवर पोहोचली. तिचा आत्मविश्वास पाहून दिग्दर्शक वैभव चिंचाळकरने तिला ऑडिशनची संधी द्यायचे ठरवले. शिविका मुळची चंदीगडची. तिचं बालपण तिकडेच गेलं. तिला मराठी भाषेविषयी काहीच माहिती नव्हती. तरीही, सध्या एकंदर टीव्ही विश्वात बहुचर्चित असलेल्या ‘नकुशी’ या मालिकेच्या वेगळेपणामुळे ती या भूमिकेसाठी इच्छूक होती. तिचे लुक्स आणि आत्मविश्वास पाहून वैभव चिंचाळकरनं तिच्या चार पाच ऑडिशन्स घेतल्या. मराठी भाषा आणि कथानकाविषयी तिला नीट समजावल्यावर वैभवला अपेक्षित असलेली शेरनाझ तिच्यात दिसू लागली.

‘शिविकाच्या बोलण्यात सहजपणे येणारं हिंदी शेरनाझच्या भूमिकेसाठी योग्य होतं. त्याशिवाय तिनंही शेरनाझ ही व्यक्तिरेखा नीट समजून घेतली. ऑडिशननंतर ती शेरनाझ साकारू शकते याचा विश्वास वाटल्यानं तिची निवड केली’ असं वैभवनं सांगितलं. नकुशीत शेरनाझ आल्यानं आता बऱ्याच घडामोडी होणार आहेत. त्याला नकुशी कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *