स्टार प्रवाहवर दर शनिवारी ‘तुफान आलंया’चं प्रसारण

सुपरस्टारपदावर विराजमान असूनही सामाजिक प्रश्नांचं भान असलेला अभिनेता आमीर खाननं महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. सहजसोप्या पद्धतीनं दुष्काळमुक्ती करण्यासाठी ‘वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेच्या रुपानं चळवळ सुरू झाली. गेल्या वर्षी ३ तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. दुष्काळाशी लढणाऱ्या या गावांचे प्रयत्न दाखवणारा ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रम आता ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे. दर शनिवारी रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे.


गेल्या वर्षी सामाजिक बांधिलकी जाणून स्टार प्रवाहने ‘पाणी वाचवा महाराष्ट्र घडवा’ या उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र देशा’ हे गाणं सादर केलं होतं. आमीर खान, किरण राव, सी.इ.ओ. सत्यजित भटकळ आणि पाणी तज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ यांनी मिळून स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशन पाया स्टार नेटवर्कनं सादर केलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून घातला गेला होता. त्यामुळे सामाजिक विकासासाठी स्टार नेटवर्कनं नेहमीच योगदान दिलं आहे. दुष्काळमुक्तीची चळवळ उभी करण्यासाठी पाणी फाउंडेशनने मागच्या वर्षी ‘वॉटर कप’ हा एक अनोखा उपक्रम राबवला.

पाणीटंचाईची सर्वाधिक समस्या असलेल्या महाराष्ट्रातील काही गावांची निवड करून या समस्येचे निवारण करण्यासाठीचे उपाय, सोपे मार्ग आणि सहज राबवता येईल असे तंत्र त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. याचा वापर करून दुष्काळमुक्त होणाऱ्या गावांना पारितोषिक देण्यात आलं. महाराष्ट्र शासनानेही यासाठी मदत केली. ही कल्पना यशस्वी ठरली. वॉटर कपला भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचा दुष्काळ मुक्त होण्याचं एक पाऊल पुढे पडलं. यंदा वॉटर कप अधिक व्यापक स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांचा स्पर्धेत समावेश असणार आहे. आठ आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. या शिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला १० लाख रुपयांचं विशेष बक्षिस मिळणार आहे. यंदाच्या वॉटर कपचं वेगळेपण म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी विविध भागांचं प्रतिनिधित्त्व करणार आहेत. भारत गणेशपुरे, अनिता दाते विदर्भाचं, गिरीश कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर मराठवाड्याचं, सई ताम्हणकर, सुनील बर्वे पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. जितेंद्र जोशी सूत्रसंचालन करत आहे.

दुष्काळमुक्तीसाठी धडपडणाऱ्या या गावांच्या प्रयत्नांना आणि पाणी फाउंडेशनच्या कामाला आपणही बळ द्या… स्टार प्रवाहवर आवर्जून पहा ‘तुफान आलंया…’ दर शनिवारी रात्री ९.३० ते १०.३० वाजता.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *