‘गेला उडत’ नाटकाचे १५० यशस्वी प्रयोग

जेव्हा एखाद्या नाटकाच्या प्रयोगाच्या संख्येत वाढ होते तेव्हा हमखास समजून जायचे की ते नाटक नि त्या नाटकातील कलाकारांनी साकारलेले पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. असाच एक सुंदर अनुभव ‘गेला उडत’ टीमने अनुभवला आहे. नुकतेच ‘गेला उडत’ नाटकाने यशस्वी १५० प्रयोग पूर्ण करुन प्रेक्षकांचे आणखी मनोरंजन करण्याच्या तयारीला लागले आहे.


थर्ड बेल एंटरटेनमेंट आणि भद्रकाली प्रॉडक्शन प्रस्तुत आणि केदार शिंदे लिखित-दिग्दर्शित ‘गेला उडत’ नाटकात सिध्दार्थ जाधव, अर्चना निपाणकर, सुरभी फडणीस, घनश्याम घोरपडे, गणेश जाधव, अमीर तडवळकर, किरण नेवाळकर, गौरव मोरे, सचिन गावडे, सुमीत सावंत आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शनची ही ५३ वी नाट्यकृती आहे. नाटक संपलं की मायबाप प्रेक्षक या नाटकाच्या संपूर्ण टीमचे मनापासून कौतुक करतो. अनेकांना नाटक संपूच नये आणि सिध्दूची एनरजेटिक भूमिका चालूच राहावी असे नक्कीच वाटत असणार.


‘गेला उडत’ या नाटकाचा शुभारंभ दिनांक १३ मे रोजी शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे झाला होता. काल दिनांक ७ मे रोजी बोरिवली येथील प्र. ठाकरे येथे १५० वा प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीने संपन्न झाला. भद्रकाली प्रॉडक्शन, केदार शिंदे यांचं दिग्दर्शन आणि सिध्दार्थची प्रमुख भूमिका या तिन्ही गोष्टी म्हणजे प्रेक्षकांना मनोरंजनाची मेजवाणीच आहे.

बोरीवलीकरांनी जे प्रेम दिलं त्याविषयी सिध्दार्थ आणि नाटकाच्या संपूर्ण टीमने त्यांचे आभार मानले. १५० यशस्वी प्रयोगाच्या निमित्ताने ‘गेला उडत’ने जोरदार सेलिब्रेशन केले.


अभिनेता सिद्धार्थ जाधवनं मारुती ही धमाल व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या अफाट एनर्जीनं रंगमंचावर सतत उत्साहाचं वातावरण असतं. त्याच्यासह प्रदीप मुळ्ये यांच नेपथ्य, शितल तळपदे यांची प्रकाश योजना, ओंकार मंगेश दत्तच गीतलेखन, साई-पियुषच संगीत तर सोनिया परचुरे आणि सॅड्रिक डिसूझा यांनी नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी या नाटकासाठी उत्तमपणे निभावली आहे.

‘गेला उडत’ टीमचे अभिनंदन आणि त्यांच्या पुढील प्रयोगासाठी शुभेच्छा!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *