खऱ्या पत्रकारितेचा शोध घेणारा ‘नागरिक’ स्टार प्रवाहवर

समाजातली काही क्षेत्रं केवळ पैसे कमावण्याची माध्यमं असत नाहीत तर त्यांच्यामागे एक प्रेरणा असावी लागते. समाजव्यवस्थेत दुर्लक्षित, पीडितांचा विकास व्हावा, वाईट गोष्टी बदलाव्यात अशी भावना या व्यवसायातल्या लोकांना असते. त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न करणे त्यांना शक्य नसले तरी समाजात चाललेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी समाजासमोर आणून त्यातून समाजालाच प्रेरणा देण्याचे किंवा त्यावर वचक ठेवण्याचा प्रयत्न करणारा व्यवसाय म्हणजे पत्रकारिता.


मात्र कधी कधी आपल्या तत्वांची, आपल्या अभ्यासाची,समाजाकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीची या समाजाला किंवा ज्यांच्याकडे समाजाचं नेतृत्व असतं अशा राजकारणाला गरज आहे का? असा प्रश्न पत्रकाराला पडतो. या दुष्ट प्रवृत्ती आहेत त्यांना बदलण्याची क्षमता आजच्या पत्रकारितेमध्ये आहे का? की इतर अनेक पैसे कमावण्याच्या व्यवसायांप्रमाणेच हाही एक भ्रष्ट व्यवसाय होऊन गेला आहे. या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करणारा चित्रपट म्हणजे नागरिक. सिंहासन मधल्या दिगू टिपणीसला पडलेला हा प्रश्न ‘नागरिक’ मधल्या श्याम जगदाळेच्या माध्यमातून अधिक जळजळीत वास्तववादी पद्धतीने मांडला जातो. या वेगळ्या आशयसंपन्न चित्रपटाचा स्टार प्रवाहवर येत्या १४ मे रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे.

‘नागरिक’मध्ये सचिन खेडेकर यांनी साकारलेला श्याम जगदाळे हा अस्सल बावनकशी अभिनयाचा अविष्कार आहे. त्याला दिलीप प्रभावळकर, नीना कुलकणी, मिलिंद सोमण, सचिन खेडेकर, देविका दफ्तरदार, सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा आणि राजकुमार तांगडे यांनी दिलेली तगडी साथ यामुळे हा चित्रपट अभिनयाची विलक्षण उंची गाठतो. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांनी बऱ्याच वर्षांनी केलेली मुख्य भूमिका हेही या चित्रपटाचं ठळक वैशिष्ट्य आहे. जयप्रद देसाई दिग्दर्शित या चित्रपटाचा राज्य पुरस्कारांसह अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव झाला आहे. दिग्गज कलावंतांची अभिनय जुगलबंदी आणि सकस आशय असलेल्या ‘नागरिक’चा १४ मे रोजी दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर होणारावर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर आवर्जून पाहण्यासारखा आहे..

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *