छबूकाका आणि बग्गीवाला चाळ करणार मृण्मयीचं कन्यादान

एकटेच असलेल्या छबूकाकांची मृण्मयी ही मानसकन्या

स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ मालिकेतील बग्गीवाला चाळीतील साऱ्याच व्यक्तिरेखा टिपीकल चाळ संस्कृतीची आठवण करून देणाऱ्या आहेत. समस्त बग्गीवाला चाळकऱ्यांमधील छबूकाका ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली आहे. गेली अनेक वर्षं नाटक, टीव्ही, चित्रपट अशा सर्व माध्यमातून मुक्तपणे संचार केलेल्या अरूण होर्णेकर यांनी छबूकाका साकारले आहेत. बाहेर फिरताना अनेकदा छबूकाका म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं आहे.


अरूण होर्णेकर हे मराठी रंगभूमीवरील महत्त्वाचं नाव आहे. त्यांनी वेटिंग फॉर गोदो, राशोमान, एक शून्य बाजीराव अशा अनेक नाटकांतून अभिनय, दिग्दर्शन केलं आहे. अतिशय हुशार दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची अॅब्सर्ड थिएटरपासून व्यावसायिक नाटकंही गाजली आहेत. गेली चार दशकं ते मराठी रंगभूमीवर निष्ठेनं काम करत आहेत. त्याशिवाय त्यांनी चित्रपट, मालिकांतूनही काम केलं आहे. ‘नकुशी’ या मालिकेत छबूकाका ही व्यक्तिरेखा त्यांनी आपल्या सहज अभिनयानं लक्षवेधी केली आहे. एकटेच असलेल्या छबूकाकांची मृण्मयी ही मानसकन्या आहे. या मानसकन्येचं आता सौरभशी लग्न होणार आहे. या लग्नासाठी नकुशी, रणजित आणि समस्त चाळकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. गंमत म्हणजे छबूकाकांनी स्वत: लग्नाची पत्रिका लिहिली आहे.


छबूकाका या भूमिकेविषयी होर्णेकर म्हणाले, ‘छबूकाका ही व्यक्तिरेखा बरीचशी माझ्यासारखी आहे. त्यामुळे मला भूमिकेसाठी वेगळं असं काही करावं लागत नाही. मी प्रत्येक भूमिका आपलीशी करतो. त्यात स्वत:चं असं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. छबूकाका ही भूमिका छान आहे आणि त्याच्या विविध छटा साकारताना मजा येते.’


‘नकुशी या मालिकेचा विषय वेगळा आहे. मालिकेचं कथानक कुठेही रेंगाळत नाही. दिग्दर्शक वैभव चिंचाळकर, उपेंद्र लिमये अशी उत्तम टीम सोबत असल्यानं काम करायलाही धमाल येते. बाहेर फिरताना लोक जेव्हा छबूकाका म्हणून ओळखतात, तेव्हा छान वाटतं,’ असं होर्णेकर यांनी सांगितलं.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *