लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि.च्या दोन पुस्तकांचे अभिनेते सचिन खेडकरांच्या हस्ते प्रकाशन

चाकोरीबाहेर जाऊन कार्य करणाऱ्या व्यक्तींचं नेहमी कौतुक होतंच, पण त्यासोबतच समाजासमोर त्या नवा आदर्शही निर्माण करत असतात. ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर आणि डॉ. वसुधा आपटे यांनी अशाच प्रकारची कामगिरी बजावत समाजमनावर स्वत:चा वेगळा ठसा उमटवण्यात यश मिळवलं आहे. लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि.च्या दैनिक प्रत्यक्षच्या माध्यमातून त्यांच्या लेखनशैलीचं दर्शनही समाजाला घडलं आहे. प्रत्यक्षमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांना वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर आता हे लेख ‘गर्द सभोवती’ आणि ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ या पुस्तकांच्या रूपाने वाचकांच्या भेटीला आले आहेत.


लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि. ची निर्मिती असलेल्या ‘गर्द सभोवती’ आणि ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ या दोन पुस्तकांचं प्रकाशन अभिनेते सचिन खेडेकर यांच्या राजा शिवाजी विद्यालयातील प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृहात वाचनप्रेमी मान्यवर श्रोत्यांच्या उपस्थितीत पार पडलं. या प्रसंगी ‘गर्द सभोवती’च्या लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर, ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’च्या लेखिका डॉ. वसुधा आपटे, निवृत्त पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित, लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि. चे समीरसिंह दत्तोपाध्याय उपस्थित होते. आदिमाता शुभंकरा स्तोत्र म्हणून पुस्तक प्रकाशन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. तद्नंतर सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असलेल्या सचिन खेडेकर, उत्सवमूर्ती असलेल्या आशालता वाबगावकर, डॉ. वसुधा आपटे, प्रवीण दीक्षित यांचं स्वागत करण्यात आलं. स्वागताच्या कार्यक्रमानंतर पुस्तक प्रकाशन आणि मान्यवरांची मनोगतं असा दिमाखदार सोहळा पार पडला.


प्रमुख अतिथीच्या रूपात आपलं मनोगत व्यक्त करताना सचिन खेडेकर यांनी माफक आणि सर्वंकष यांतील फरक सांगत या पुस्तकांचं प्रकाशन हे केवळ अनुभवांची शिदोरी इतकंच मर्यादित नसल्याचं म्हटलं. खेडेकर म्हणाले की, आशालताताईंनी जीवनातील ६० वर्षे रसिकांची सेवा केली आहे. यादरम्यान केवळ मराठीच नव्हे तर हिंदी भाषेतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशा ज्येष्ठ अभिनेत्रींच्या कारकिर्दीतील अनमोल आठवणी एका पुस्तकात बंदिस्त करून सादर करणं ही वाचकांसाठी मोठी पर्वणीच आहे. त्याच प्रमाणे डॉ. वसुधा आपटे यांचं ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ हे पुस्तका पोलिसांसाठी उपयुक्त ठरणारं आहे. न्यायवैद्यक शास्त्र हे गुन्हेगाराचा माग घेण्यात कशा प्रकारे सहाय्यक ठरतं त्याची विस्तृत माहिती या पुस्तकात आहे. ही दोन्ही पुस्तकं वाचनाबाबत रूची निर्माण करणारी आहेत. आजही वाचनसंस्कृती आहे, परंतु आता ती जोपासण्याची गरज आहे. पाहता येत असेल, तर वाचायची काया गरज? ही मानसिकता बदलण्याची आवश्यकता असल्याचं सांगत वाचनसंस्कृती टिकावी यासाठी सर्वांना प्रयत्न करण्याचं आवाहन खेडेकर यांनी केलं. या सोहळ्याचे सूत्रसंचालक विनोद सातव यांच्या आग्रहाखातर खेडेकर यांनी विंदांच्या लेखणीतून आकाराला आलेल्या ‘… त्याला तयारी पाहिजे’ या कवितेचं आपल्या खुमासदार शैलीत वाचन करीत उपस्थितांची दाद मिळवली.


आशालता वाबगावकर आणि डॉ. वसुधा आपटे या दोन्ही लेखिकांनी आपल्या लेखनाचं श्रेय डॉ. अनिरुद्धबापू जोशी यांना देत त्यांच्या प्रेरणेनेच लेखिका बनल्याचं मत व्यक्त केलं. मी कोण होते, कोण आहे आणि कोण होणार हे ठाऊक नसताना बापूंमुळे नवी ओळख मिळाल्याचं सांगत आशालताताई म्हणाल्या की, ‘गर्द सभोवती’ हे पुस्तक म्हणजे आजवरच्या प्रवासात आलेल्या आठवणींचा अल्बम आहे. बापूंच्या प्रेरणेमुळे आयुष्यातील जुन्या आठवणी कागदावर उतरवत गेले आणि त्या लेख स्वरूपात प्रकाशित होत गेल्या. आज त्या पुस्तक रूपाने वाचकांच्या समोर येत असल्याचा अत्यानंद होत आहे. अजून खूप आठवणी शिल्लक आहेत. त्या यापुढेही लिहीत राहीन असं अश्वासन देत आशालताताईंनी सांगितलं. प्रवीण दीक्षित यांनी न्यायवैद्यक शास्त्र म्हणजे काय त्याची थोडक्यात माहिती देत पोलिस तपास यंत्रणेत सहभागी असणाऱ्या नवनवीन यंत्रणांची माहिती देणाऱ्या पुस्तकांचीही निर्मिती करण्याचं आवाहन लोटस पब्लिकेशन्स प्रा. लि.चे दत्तोपाध्ये यांना केलं.


३५ वर्षे न्यायवैद्यक शास्त्रामध्ये सेवा देणाऱ्या डॉ. वसुधा आपटे यांनी २००६ नंतर ‘प्रत्यक्ष’च्या माध्यमातून लेखमालेला सुरुवात केली. ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ या पुस्तकाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, आपल्या समाजात न्यायवैद्यक शास्त्राबाबत माहिती फार कमी आहे. समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत. अनिरुद्धबापूंच्या प्रेरणेने न्यायवैद्यक शास्त्राबाबतचे गैरसमज दूर करण्याची संधी मिळाली. मृत्यू हा जिथे केंद्रस्थानी असतो अशा कार्यक्षेत्रामध्ये काम केल्यानंतर मृत्यूबद्दलची भीती खूपच कमी झाली आणि जीवनाबद्दलची महती नित्यनव्याने मनावर ठसत गेली. त्यामुळे मी नेहमी कॉलिटी ऑफ लाईफला महत्व दिलं. आपल्या आनंदात इतरांनाही सहभागी करून घ्यावं आणि जीवनाची आनंदयात्रा व्हावी असं वाटायचं. ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ हे पुस्तक म्हणजे याच आनंदयात्रेचा एक भाग असल्याचं प्रतिपादन डॉ. वसुधा आपटे यांनी केलं.

डॉ. वसुधा आपटे यांनी लिहिलेल्या ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ या पुस्तकाची प्रस्तावना प्रवीण दीक्षित यांनी लिहिली असून, आशालता वाबगावकर यांच्या ‘गर्द सभोवती’ या पुस्तकाला अभिनेता, दिग्दर्शक सुबोध भावे यांची प्रस्तावना लाभली आहे. न्यायवैद्यक शास्त्रातील विविध ८६ विषयांच्या माध्यमातून ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ — न्यायवैद्यक शास्त्र’ हे पुस्तक लिहिण्यात आलं असून ‘गर्द सभोवती’ या पुस्तकात आशालता यांच्या विविध प्रकारच्या ६७ आठवणींचा समावेश आहे. या पुस्तकांचं मुद्रीतशोधन शरद विचारे यांनी केलं आहे.

मान्यवरांच्या प्रतिक्रिया :

 • ‘गर्द सभोवती’च्या माध्यमातून आठवणींचा खजिना उलगडलाय : आशालता वाबगावकर
 • भविष्यातही मनातील आठवणी लिहित राहीन… : आशालता वाबगावकर
 • अभिनय आणि गायनानंतर लेखिका झालेय : आशालता वाबगावकर
 • जीवनातील आनंदयात्रेचा एक भाग आहे ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ : डॉ. वसुधा आपटे
 • समाजमनातील गैरसमज दूर करेल ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ : डॉ. वसुधा आपटे
 • मृतांनाही न्याय मिळवून देणाऱ्या तंत्राची माहिती देईल ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ : डॉ. वसुधा आपटे
 • ‘गर्द सभोवती’ हे पुस्तक वाचकांसाठी मोठी पर्वणी : सचिन खेडेकर
 • ‘गुन्हेगारांचे कर्दनकाळ’ पोलिसांसाठी अतिशय उपयुक्त : सचिन खेडेकर
 • वाचनातून मिळणारं ज्ञान वर्षानुवर्षे टिकतं : सचिन खेडेकर
 • वाचनसंस्कृती टिकावी यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत : सचिन खेडेकर
 • पोलिस तपासयंत्रेणेतील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती वाचकांपर्यंत पोहोचावी : प्रवीण दीक्षित

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *