‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटामधील कलाकारांचा पुणेकरांना सुखद धक्का!

आकर्षक हलते देखावे, मनोवेधक सजावट, जिवंत देखाव्यांसाठी पुण्यातील गणेशोत्सव सुप्रसिद्ध आहे. गणेशोत्सवाचा १० वा दिवस आणि रविवार असे औचित्य साधून पुण्यात भाविकांचा महापूर लोटला होता. गर्दीने फुललेले रस्ते, खाद्यपदार्थांचा दरवळ, देखावे बघणारे अबालवृद्धांचे उत्सुक चेहरे यामुळे सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.


फर्ग्युसन कॉलेज रोड जवळील उदय तरुण मंडळाने उभारलेला ‘म्हैसूर पॅलेस’ हा देखावा बघण्यासाठी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच अचानक सिनेसृष्टीतील काही प्रसिद्ध चेहरे तिथे उपस्थित असल्याचे लक्षात आले. प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित आणि पुनित बालन निर्मित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील एका दृश्याचे वास्तववादी चित्रण करण्यासाठी तेथे उपेंद्र लिमये, मिलिंद दास्ताने, सुरेश विश्वकर्मा, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, क्षितीश दाते, शरद जाधव, श्रीपाद चव्हाण, महेश लिमये आणि प्रवीण तरडे हे कलाकार उपस्थित होते. राजकारणी, पोलीस, गुन्हेगारांच्या वेशभूषेतील या कलाकारांना बघून उपस्थितांमध्ये खूप उत्सुकता पसरली होती. आणि त्यामुळे तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली.


ही गर्दी नियंत्रित करण्यासाठी दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि पोलिसांच्या वेशातील कलाकार स्वतः रस्त्यावर उतरले व तेथील स्वयंसेवकांना मदत करू लागले. पोलिसांच्या वेशातील आपल्या लाडक्या कलाकारांना गर्दी नियंत्रित करताना बघून पुणेकरदेखील सुखावले.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *