‘फास्टर फेणे’ लवकरच येतोय रहस्य उलगडायला

गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर तुम्ही मराठी कलाकारांचे ‘फ’ची बाराखडी बोलतानाचे काही व्हिडिओ पाहिले असतील. हे कलाकार बाराखडी का म्हणत आहेत आणि त्यातही नेमकी ‘फ’ची बाराखडी का बरं म्हणत आहेत, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर याचं कारण म्हणजे अभिनेता अमेय वाघची मुख्य भूमिका असलेला ‘फास्टर फेणे’ हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.


‘झी स्टुडिओज’ने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर हा टीझर पोस्ट केला आहे. ‘चाहूल लागताच रहस्यांची त्याला क्षणात येते जाग. मोठा झालाय भा. रा. भागवतांचा फाफे. आता कोणाचा काढतोय माग…?’ असं कॅप्शन या टीझरसोबत देण्यात आलं आहे. फास्टर फेणेच्या पुस्तकाच्या पृष्ठभागापासून सुरु होणाऱ्या या टीझरच्या अखेर अमेय वाघचा चेहरा पाहायला मिळतो. टीझरमधल्या पार्शसंगीतातून त्यामध्ये दडलेल्या रहस्याची अनुभूती येते.

अनेकांनी बालपणी मे महिन्याच्या सुट्टीत ‘फास्टर फेणे’ची सचित्र रोमहर्षक पुस्तके अनेकांनीच वाचली असतील. प्रसिद्ध लेखक भा. रा. भागवत यांचे हे पात्र प्रचंड लोकप्रिय झाले होते. फास्टर फेणेच्या या रंजक कथा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार चित्रपटाच्या स्वरुपात घेऊन येत आहेत. रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख आणि मंगेश कुलकर्णी हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.


भास्कर रामचंद्र भागवत यांनी लिहिलेलं हे पात्र ६०च्या दशकात प्रचंड गाजलेलं. बनेश उर्फ फास्टर फेणेच्या रंजक कथांनी त्यावेळी अनेक लहानग्यांचं जग व्यापलं होतं. आता अमेय वाघ फास्टर फेणेच्या रुपात प्रेक्षकांना किती आवडतोय हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. २७ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *