‘थापाड्या’ मराठी चित्रपटाचा मुहूर्त सोहळा

“जो पर्यंत चित्रपटसृष्टी अस्तित्वात आहे तोपर्यंत दादा कोंडकेंना लोक विसरणे शक्यच नाही एवढे सातत्याने ओळीने चित्रपट रौप्य महोत्सवी द्यायचे हे काही येऱ्या गबाळ्याचे काम नाही मात्र ते त्यांनी त्यांच्या मेहनतीने व कामातून करून दाखवले त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रात काम करत असताना जीव ओतून त्याच्यामध्ये काम केले पाहिजे व त्यातून प्रेक्षकांना आनंद मिळाला पाहिजे.

thapadya marathi movie

मी या क्षेत्रापासून थोडा लांबच राहिलो असल्याने आज दिग्दर्शक अजित शिरोळे यांनी सांगितल्याप्रमाणे जीवनात पहिल्यांदाच चित्रपटाला मुहूर्ताचा क्लॅप दिला आणि तो ही ‘थापाड्या’ सारख्या नावाच्या चित्रपटाला त्यामुळे काही लोकांच्या मनात प्रश्न येणे साहजिकच आहे मात्र गेल्या तीन साडेतीन वर्षापासून आपण सगळेच बघतो आहोत की कशाप्रकारे थापा चाललेल्या असून लोकांना बनवण्याचे काम चालू आहे, कदाचित त्याच्यातूनच भाऊ साहेबांना ‘थापाड्या’ हे नाव सुचले असावे असे मला वाटते आहे. मी जरी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलो तरी मी त्या भूमिकेतून हे बोलत नसून आता सहनशीलतेचा अंत झाला आहे असे मला वाटते पण आता लोकांना जाणवू लागले आहे की हे फसवण्याचे काम चालू आहे त्यावेळस मग कोणीही असले तरी लोक गप्प बसत नाहीत आणि म्हणूनच या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव समर्पक आहे असा माझा कयास आहे तो कदाचित चुकीचा असेल कदाचित बरोबर असेल.”

मानसी फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत, भाऊसाहेब भोईर व शरद मस्के याची निर्मिती असलेला अजित शिरोळे दिग्दर्शित ‘थापाड्या’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा मंगळवारी मुंबईत मोठ्या थाटामाटात संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताला आपली उपस्थिती का हे सांगितले. निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या प्रस्तावनेत म्हटले “लहान वयामध्ये ज्या कल्पना सुचत असतात त्याला मूर्त स्वरूप येण्यासाठी योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटावी लागते असे अजितदादा पवार माझ्या जीवनात आल्याने मराठी चित्रपटसृष्टीत नफा नसतानाही मी थापाड्या हा चौथा चित्रपट काढू शकलो ते फक्त अजितदादाच्या आशीर्वादाने. मला बऱ्याच जणांनी विचारले या चित्रपटाला ‘थापाड्या’ हे नाव देणे कसे सुचले तेव्हा मी त्यांना सांगितले की आज काल या नावाला बरे दिवस आल्याने हेच नाव देण्याचे ठरवले.”

नाट्यचळवळीत आज जी काही थोडी फार उर्जितावस्था आहे ती अजितदादांच्या प्रयत्नामुळेच असे माझे मत आहे. आम्ही मानसी फिल्म प्रॉडक्शनच्या वतीने ज्यांना कोणतीही चित्रपटाची पार्श्वभूमी नाही अश्या कलाकारांना संधी देवून नवीन कलाकार घडवण्याचे कार्य करत आहोत.

thapadya marathi movie

यावेळेस मोहन जोशी यांनी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. अभिनय सावंत, मानसी मुसळे, सोनाली गायकवाड या तीन कलाकारांनी स्कीट सादर केले त्यानंतर या तिन्ही कलाकारांचे अजितदादा पवार यांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. या प्रसंगी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, निर्मात्या संघाचा अध्यक्ष प्रसाद कांबळी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, निर्माते भाऊसाहेब भोईर, शरद मस्के व इतर मान्यवर हजर होते. सरते शेवटी मानसी मुसळे यांनी “थाप मारुनी थापाड्या गेला” या लावणीवरती नृत्याविष्कार सादर केला.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *