किशोर कुमार यांना ‘न भूतो न भविष्यती’ अशी श्रद्धांजली !

संगीत क्षेत्रातील ‘बेताज बादशहा’ ठरलेल्या किशोर कुमार यांना आपल्यातून जाऊन येत्या १३ ऑक्टोबरला ३० वर्षे पूर्ण होत आहेत. गेल्या ३० वर्षांत नियमीतपणे त्यांना श्रद्धांजली अर्पण होत आली आहे. पण या वर्षी ही श्रद्धांजली खूप आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी होणार आहे. पुण्यातील अष्टपैलू गायक जितेंद्र भुरूक, किशोर कुमारांना एकमेवाद्वितीय अशी श्रद्धांजली वाहणार आहेत, तेही त्यांच्या जन्मगावी म्हणजे मध्यप्रदेशातील खांडवा येथे!


जितेंद्र भुरूक यांना किशोर कुमारांचे ‘एकलव्य शिष्य’ म्हणता येईल कारण संगीतातील कोणतंही शास्त्रीय शिक्षण न घेता किशोरदांना फक्त ‘ऐकून ऐकून’, जितेंद्र गाऊ लागले आणि किशोर कुमारांचा भास व्हावा इतकं ते तंतोतंत गातात. जितेंद्र भुरूक यांच्या, किशोर कुमारांच्या गाण्यांवर आधारित — ‘गीतों का सफर’ या कार्यक्रमाचे आजवर हजारो प्रयोग झाले आहेत. दरवर्षी किशोरदांच्या जयंती आणि पुण्यतिथीला जितेंद्र भुरूक, किशोरदांना ‘स्वरमयी श्रद्धांजली’ वाहत असतात. किशोरदांच्या ८० व्या जयंती निमित्त भुरूक यांनी सलग ८० गाणी गाऊन एक जबरदस्त विक्रम केला आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही म्हणजेच येत्या १३ ऑक्टोबरला भुरूक, किशोरदांना श्रद्धांजली वाहतील — एका अविस्मरणीय पद्धतीनं !


भुरूक यांच्या गाण्यांची भूरळ, मध्यप्रदेश सरकारला देखील पडली असून, मध्यप्रदेश सरकारने भुरूक यांना किशोर कुमारांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्य प्रदेशातील ‘खांडवा’ या त्यांच्या जन्मगावी कार्यक्रम करण्याचे निमंत्रण दिले आहे. इथे किशोर कुमारांच्या हवेलीपाशी एक स्टेज उभारण्यात येणार असून तिथे जितेंद्र भुरूक हे किशोरकुमार यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचं वैशिष्टय असं की इथे एकाच स्टेजवर किशोर कुमार यांचा पुतळा बनविण्याचे काम आणि किशोरकुमारांची गाणी असे दोन्ही एकाच वेळेस सुरु होईल आणि पुतळा बनवून पूर्ण होईपर्यंत भुरूक किशोरकुमारांची गाणी सलग गात राहतील! सकाळी ११ वाजता सुरु झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी अंदाजे ६ वाजेपर्यंत चालेल. पुतळा पूर्ण होईपर्यंत भुरूक अखंडपणे गात राहतील. नगरचे प्रसिध्द शिल्पकार प्रमोद कांबळे हा पुतळा बनविणार असून त्यांच्या मते हा पुतळा पूर्ण होण्यासाठी कमीतकमी ५ ते ६ तास लागतील. अद्वितीय स्वरात भिजलेल्या मातीच्या या पुतळ्यावरून पुढे दोन — तीन महिन्यात शेवटचा हात फिरेल आणि किशोर कुमारांच्या हवेलीच्या शेजारच्या चौकात तो उभा केला जाईल आणि त्या चौकाचे नामकरण देखील केले जाईल. या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटातील किशोर कुमारांनी गायलेल्या काही गाण्यांचे ‘व्हिज्युअल्स’ पडद्यावर दिसत असतांना भुरूक त्याबरोबर ‘सिंक्रोनायझेशनने’ गातील ! ‘खांडवाकरांना’ हा नक्कीच एक भन्नाट अनुभव असणार आहे.


या अद्भुत कार्यक्रमासाठी जितेंद्र पुण्यातून मोठा वाद्यवृंद घेऊन लवकरच खांडव्याला रवाना होणार आहेत. भारतातील अशा प्रकारचा हा पहिलाच कार्यक्रम असून अशा प्रकारची श्रद्धांजली क्वचितच कोणाला वाहिली गेली असेल !

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *