भव्यदिव्य सोहळ्यात पंढरपूरमध्ये अवतरली ‘विठू माऊली’

आजवर स्टार प्रवाहनं कायमच आशयसंपन्न मालिका सादर केल्या आहेत. ‘विठू माऊली’ या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाह अजून एक पाऊल पुढे टाकत आहे. लोकोद्धारासाठी झालेला विठ्ठल अवतार, भक्तांना माहित नसलेली विठ्ठलाची कहाणी या मालिकेतून सादर केली जाणार आहे. विठ्ठल, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यातलं नातंही ही मालिका उलगडणार आहे. तसंच विठ्ठलाच्या अवतारानं ही जगाची माऊली कशी झाली, या अवतारामुळे लोकोद्धार कसा झाला हेही पाहता येणार आहे. विठू माऊली या मालिकेच्या रूपानं एक भव्यदिव्य कथानक प्रेक्षकांसमोर येणार आहे. विठ्ठलाचा महिमा जितका भव्य आहे, तशीच ही मालिकाही भव्यदिव्य असणार आहे. या मालिकेसाठी खास कॉस्च्युम आणि ज्वेलरी डिझायनिंग करण्यात आलं आहे. उच्च दर्जाच्या कम्प्युटर ग्राफिक्सची जोडही या मालिकेला मिळाली असल्यानं कथानकातली भव्यता प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.

महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजन अंतर्गत या मालिकेची निर्मिती केली आहे. स्टार प्रवाहनं आतापर्यंत आपल्या मालिकांतून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली. विठूमाऊली या मालिकेतही आपल्याला अनेक नवे चेहरे पहायला मिळणार आहेत. या मालिकेत विठ्ठलाच्या भूमिकेत अजिंक्य राऊत, रुक्मिणीच्या भूमिकेत एकता लबडे, सत्यभामाच्या भूमिकेत बागेश्री निंबाळकर आणि राधाच्या भूमिकेत पूजा कातुर्डे हे कलाकार दिसणार आहेत. त्याशिवाय इतर महत्त्वाच्या भूमिकांमध्ये अनुभवी कलाकारही आहेत. मालिकेची पटकथा संतोष अयाचित आणि पराग कुलकर्णी यांची आहे, तर अजिंक्य ठाकूर संवाद लेखन करत आहेत. या कथानकाची भव्यता रुपेश पाटील चित्रीत करत आहेत. तर अविनाश वाघमारे मालिकेचे दिग्दर्शक आहेत. मालिका सुरू होण्यापूर्वीच याच्या शीर्षक गीताविषयी मोठी चर्चा आहे. आपल्या पहाडी आवाजात आदर्श शिंदे यांनी हे शीर्षक गीत गायलं आहे. गुलराज सिंग यांनी हे गीत संगीतबद्ध केलं आहे. गुलराज यांनी यापूर्वी ए. आर. रेहमान, शंकर-एहसान-लॉय अशा अनेक दिग्गजांसह संगीत निर्मिती केली आहे. अक्षयराजे शिंदे यांनी हे गीत लिहिलं आहे.


मालिकेविषयी निर्माते महेश कोठारे म्हणाले, ‘विठ्ठल हे महाराष्ट्राचं दैवत आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरातील माणूस विठ्ठलाचा भक्त आहे. त्यात गरीब-श्रीमंत असा भेद नाही. प्रत्येकाच्या विठ्ठलाशी भावना जोडलेल्या आहे. मात्र, अनेकांना विठ्ठलाची गोष्ट माहीत नाही. ती मालिकेतून आम्ही दाखवणार आहोत. महाराष्ट्राचं लाडकं दैवत असूनही तितक्या भव्यतेनं विठ्ठल महाराष्ट्रापुढे मांडलाच नाही कुणी. या मालिकेतून विठ्ठलाची कथा, त्याचे पौराणिक संदर्भ जपून, रंजक पद्धतीनं आणि तितक्याच भव्यतेनं सादर केली जाणार आहे. आमच्या टीमनं त्यासाठी पंढरपूरला जाऊन अभ्यास केला आहे, अनेक पोथ्या-पुराणांतून संदर्भ घेतले आहेत. विठ्ठल मंदिराचे विश्वस्त, जाणकार-तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेतलं आहे. या मालिकेतून या दैवताविषयी असलेल्या भावनांना अधिक उंचीवर घेऊन जायचं आहे. त्यासाठी सगळा अभ्यास केला आहे. ही मालिका महाराष्ट्र नक्कीच डोक्यावर घेईल, विठूमाऊली समोर नतमस्तक होईल याची मला खात्री आहे.’

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *