५५० ऑडिशन्समधून सापडली विठूमाऊली

स्टार प्रवाहची पौराणिक नवी मालिका ‘विठूमाऊली’नं अल्पावधीतच महाराष्ट्रावर गारूड केलं आहे. मात्र, या मालिकेतल्या विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी कलाकाराची निवड करणं हे मोठं आव्हान होतं. तब्बल ५५० कलाकारांची ऑडिशन झाल्यानंतर विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी अजिंक्य राऊत या नव्या अभिनेत्याची निवड झाली.


विठूमाऊली या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून स्टार प्रवाहवर 30 ऑक्टोबरपासून नवं पर्व सुरू झालं आहे. अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असलेल्या विठूमाऊली दररोज तिन्हीसांजेला घराघरांत दर्शन होत आहे. वेगळं कथानक, भव्यता सादरीकरण आणि उच्च निर्मितीमूल्यांमुळे ही मालिका महाराष्ट्राच्या आणि विठ्ठलभक्तांच्या पसंतीला उतरत आहे. या मालिकेद्वारे अजिंक्य राऊत या नवोदित अभिनेत्याला विठूमाऊली साकार करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. त्याच्या अभिनय प्रवासातली ही सर्वांत मोठी भूमिका आहे.


अजिंक्यच्या निवडीबद्दल मालिकेचे निर्माते महेश कोठारे म्हणाले, ‘विठूमाऊलीच्या भूमिकेसाठी आम्हाला नवा चेहरा हवा होता. कारण, प्रेक्षकांना माहित असलेल्या अभिनेत्याला प्रेक्षक विठूमाऊली म्हणून कसं स्वीकारतील हा प्रश्न होता. त्यामुळे या भूमिकेसाठी आम्ही नव्या अभिनेत्याचा शोध घेत होतो. जवळपास ५५० ऑडिशन्स घेऊन झाल्या. तरीही हवा तसा अभिनेता सापडत नव्हता. त्यावेळी आमची टीम पंढरपूरला गेली आणि विठूमाऊलीच्या पायावर डोकं ठेवून ‘विठूमाऊली सापडू दे’ असं साकडं घातलं. त्यानंतर आमची टीम मुंबईला परतली आणि ऑडिशनमध्ये आम्हाला अजिंक्य राऊत हा अभिनेता सापडला. अजिंक्य हा उत्तम अभिनेता आहेच; मात्र त्याचे डोळे बोलके आहेत. त्याचं दिसणंही विठूमाऊलीला साजेसं होतं.’


महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाची भव्यदिव्य कहाणी पहा ‘विठूमाऊली’ या मालिकेत सोमवार ते शनिवार सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *