सुनिधी चौहान व शाल्मली खोलगडे पहिल्यांदा एकत्र

आपल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे आगामी ‘बबन’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाच्या ‘साज ह्यो तुझा’ या पहिल्या गीताने सोशल मिडीयावर रसिकांची पसंती मिळविली आहे. त्याला चार लाखाहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत.


आता ‘बबन’ सिनेमातील दुसरे गाणे ‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जादुई आवाजाने बॉलीवूडला वेड लावणाऱ्या दोन गायिका पहिल्यांदाच एकत्र गाणार आहेत. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी याचे पार्श्वगायन केले असून संगीत ओंकारस्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे. रेकॉर्डिंगला लाईव्ह संगीत असलेल्या या गीताचे शूटिंग प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या ओरीजनल तमाशाच्या तंबूत झाले आहे.

https://www.youtube.com/watch?v=TVzMjnJj5LY

या गाण्यासाठी ऱ्हीदमीस्ट म्हणून संगीतकार प्रीतम यांच्या सोबत काम केलेले दिपेश वर्मा आणि उस्ताद झाकीर हूसेन यांचे भाचे शिखरनाद कुरेशी यांनी काम पाहिले तसेच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम केलेल्या काहीजणांचा समावेश वादक टीम मध्ये आहे. या गाण्याचे खास आकर्षण म्हणजे ‘सौदागर’, ‘खलनायक’ अशा हिंदी सिनेमातील गाण्यामध्ये आपल्या “नादरूपमं” चे विविधांगी कौशल्य दाखविणाऱ्या गजानन साळूके यांचे नादरूपमं आणि सुंदरी वादन.

‘मोहराच्या दारावर कैऱ्या मागणं’ या गीता मध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बेले असे तिहेरी संगम असलेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केले आहे व वेशभूषा अस्मिता राठोड व अंजली भालेराव यांची आहे. या गाण्यांचे रेकॉर्डिंग यशराज स्टूडीओ मध्ये झाले असून गाण्याचे मास्टरिंग लंडन येथील स्टूडीओ मध्ये करण्यात आले असल्याने रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.

चित्रक्षा फिल्म्स प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, प्रांजली कंझारकर, मृणाल कुलकर्णी, कृतिका तुळसकर, सीमा समर्थ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *