‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम

चित्रपटातील भूमिका वस्तुदर्श आणि स्वाभाविक वाटावी म्हणून आज कलाकार कितीही मेहनत करायला व त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलिकडील अनुभव म्हणजे मुक्ता बर्वे ने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी म्हणजे या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे. चित्रपटाची कथा दोन स्त्रीयांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला नावाच्या मुक्ताच्या व्यक्तिरेखेसाठी विणकाम शिकणे गरजेचे होते. मुक्ताने ते अल्पावधीतच शिकून घेतले आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या या व्यक्तिरेखेसाठी उठवला.

स्त्रीसशक्तीकरणाचा एक आगळा वस्तुपाठ या व्यक्तिरेखेतून रसिकांना अनुभवायला मिळेलच, पण त्याचबरोबर रसिकांसमोर येईल ती या चित्रपटातील अभिनेत्रींनी घेतलेली मेहनत आणि त्यातून दिसलेली त्यांची प्रतिभा. नावाप्रमानेच ही दोघींची कथा… त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच… विचार वेगळे पण आवड एकच… त्या वेगळ्या, पण तरीही एकच… ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची.

चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डीझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे. तसेचया चित्रपटाची पटकथा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची आहे आणि संवाद भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.

‘आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप-मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टिकोन सुद्धा ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल”, असे उद्गार दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.

येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आम्ही दोघी’ या चित्रपटाच्या वेगळ्यापणामुळे चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.


Originally published at Marathi PR.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *