‘गुलाबजाम’ येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

“अन्न हे पूर्णब्रम्ह” हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थांचे माहेरघरच; आणि जेवणाची पंगत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रुचकर पदार्थांनी सजलेलं ताट. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाचा मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ सारखा सुपरहिट चित्रपट देऊन रसिकप्रेक्षकांचे खुसखुशीत मनोरंजन करणाऱ्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्स व झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गुलाबजाम’ चा गोडवा येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ह्या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज्चे मंगेश कुलकर्णी, निर्माते विनोद मलगेवार उपस्थित होते.


चित्रपटाची कथा आहे लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या आदित्यची आणि पुण्यात डबे बनवून देणाऱ्या राधाची. लंडनमध्ये मराठी पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट काढायचे आदित्यचे स्वप्न आहे. आदित्य आपली लंडनमधील नोकरी सोडून मराठी पारंपारिक जेवण शिकण्याच्या हेतूने पुण्यात येऊन दाखल होतो. पुण्यात राहणाऱ्या आणि लोकांना जेवणाचे डबे बनवून देणाऱ्या राधा आगरकरचा आदित्यला शोध लागतो. सुगरण राधाचा शिष्य होणे ही सोपी गोष्ट नाही, हे आदित्यला कळून चुकते. ह्या प्रवासात दोघांनाही एकमेकांची मने आणि भूतकाळातील प्रसंग समजतात आणि माणूस म्हणून ते दोघे एकत्र स्वयंपाक करताना समृद्ध होत जातात.

झी स्टुडिओज् ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गोल्डन गेट मोशन पिक्चर यांचे विनोद मलगेवार आणि विशाल चोरडिया यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांचे असून, दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन केलंय सुचित्रा साठे यांनी तसेच नयनरम्य छायाचित्रण केलंय छायालेखक मिलिंद जोग यांनी. पूर्वा पंडित यांचे कला दिग्दर्शन असून फूड स्टायलिंगची जबाबदारी पेलली आहे सायली राज्याध्यक्ष आणि श्वेता बापट यांची. चित्रपटाला देबार्पितो साहा यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात ‘मन खमंग’ असे गाणे असून ते संगीतबद्ध केले आहे थायकुड्डम ब्रिज यांनी. हे गाणं लिहिलंय तेजस मोडक यांनी तर स्वरबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, महेश घाग, मधुरा देशपांडे, चिन्मय उदगीरकर आणि मोहनाबाई हे कलाकार आहेत.


येत्या १६ फेब्रुवारीला मनातली चव पदार्थांमध्ये उतरवणाऱ्या सगळ्यांची आणि सगळ्यांसाठीची गोष्ट गोल्डन गेट मोशन पिक्चर्स व झी स्टुडिओज् रसिक प्रेक्षकांना बहाल करणार आहे आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.


Originally published at Marathi PR.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *