प्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर


चित्रपटसृष्टीत प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. आजवर याच संकल्पनेवरचे कितीही चित्रपट आले असले तरी प्रत्येक चित्रपटातून प्रेमाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. आता ‘रॉमकॉम’ हा चित्रपटही प्रेमाचा वेगळ्या पद्धतीनं शोध घेणार आहे.

नुकताच मुंबईत या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त करण्यात आला. लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि किशोर कदम यांच्या हस्ते हा मुहूर्त संपन्न झाला. ‘ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट’ या आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सचिन शिंदे ‘रॉमकॉम’ हा चित्रपट करत आहेत. सुशील शर्मा सहनिर्माता आहेत. वेगळ्या संकल्पना, वेगळे विषय हाताळणारे गोरख जोगदंडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. निर्माता सचिन शिंदे यांनी पूर्वी अनेक जाहिराती, मालिका, चित्रपटांसाठी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं आहे. आता ते रॉमकॉम चित्रपटाद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे.


रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. चित्रपटांसाठी वेडा असलेला राहुल आणि सुसंस्कृत घरातली सुमन यांच्यातलं प्रेम यशस्वी होतं का, सुमनला मिळवण्यासाठी राहुलला काय काय करावं लागतं हे मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त अनेक सुखद धक्का देणाऱ्या गोष्टी या चित्रपटात असून त्याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.

‘रॉमकॉम’ या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बावनकशी अभिनयाने चित्रपटांना वेगळी उंची प्राप्त करून देणारे अभिनेते किशोर कदम आणि सैराट तसेच सध्या न्यूड मधल्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अभिनयसंपन्न छाया कदम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे, स्वाती पानसरे, मृदुला वैभव सहकलावंत आहेत. युवा अभिनेता सारंग दोशी आणि मधुरा वैद्य ही जोडी या चित्रपटाद्वारे पदार्पण करते आहे. मृदुला वैभव क्रिएटिव्ह हेड असून, शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अनिकेत करंजकर सिनेमॅटोग्राफी आणि साजन पटेल संगीत दिग्दर्शन करत आहेत.

‘बरीच वर्षं हिंदीत काम करूनही मराठी भाषा, चित्रपटांविषयी आपुलकी मनात होती. म्हणून पहिला चित्रपट मराठीमध्ये करतो आहे. ‘रॉमकॉम’ ही एक धमाल गोष्ट आहे. वेगळीच प्रेमकहाणी या चित्रपटातून अनुभवायला मिळेल’, असं निर्माता सचिन शिंदे यांनी सांगितलं.


Originally published at Marathi PR.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *