नम्रता प्रधान कशी झाली ‘छत्रीवाली’


स्टार प्रवाहवर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद…


छत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका, या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या मालिकेसाठी ऑडिशन सुरु असल्याचं मला समजलं आणि मी ऑडिशनसाठी फोटो पाठवले होते. त्यात माझी निवड झाल्यानंतर दोनवेळ लूक टेस्ट झाली. तो लूक योग्य वाटला सगळ्यांना आणि अपेक्षित असणारी छत्रीवाली त्यांना माझ्यात सापडली. छत्रीवालीमुळे माझं अभिनयाचं स्वप्न पूर्ण होतंय असंच म्हणावं लागेल.

मालिकेतली मधुरा आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वात काही साम्य आहे? ही व्यक्तिरेखा साकारताना अभिनेत्री म्हणून काय विचार करतेस?

आमच्यात खूपच साम्य आहे. मधुरा आणि मी जवळपास सारख्याच आहोत असंही म्हणता येईल. कारण, मी माझ्या कुटुंबाशी खूप घट्ट आहे. मधुरा कोणताही निर्णय विचार करून घेते, तसंच माझंही आहे. मधुरा जितकी कॉन्फिडंट आहे, तशीच मीही आहे. त्यामुळे माझ्यासाठी मधुरा वेगळी नाहीच. ही व्यक्तिरेखा साकारताना मला वेगळं असं काहीच करावं लागत नाही.


या मालिकेत तुझ्याबरोबर अनुभवी कलाकार आहेत, या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे?

खूपच मस्त… आम्ही सगळे सेटवर खूप मजा करतो. त्यामुळे सेटवरचं वातावरण छान राहातं. सगळेजण ते वातावरण एंजॉय करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आम्ही प्रत्येक सीनची रिहर्सल करतो. त्यामुळे सीन करताना सोपं जातं. त्याशिवाय सगळे सीनियर्स मला सांभाळून घेतात, मी चुकत असेन तर सांगतात. त्यामुळे मलाही दडपण येत नाही. आता या सगळ्यांबरोबर माझी छान केमिस्ट्री तयार होतेय.

स्टार प्रवाहनं आजपर्यंत अनेक नव्या कलाकारांना संधी दिली, त्यात आता तुझंही नाव आलंय, कसं वाटतंय?

स्टार प्रवाहच्या मालिकेतून माझं पदार्पण होणं हे माझं भाग्य आहे. अनेक कलाकारांचं करिअर स्टार प्रवाहवरच सुरू झालं होतं. स्टार प्रवाहची क्रिएटिव्ह टीम, आमचे निर्माते, दिग्दर्शक सगळ्यांशीच माझं छान नातं झालं आहे.

मधुराचं आणि छत्रीचं एक नातं आहे, तुझ्यासाठी छत्री किती खास आहे?

मला स्वतःला छत्री आवडतेच. पावसाळ्यात छत्री सोबत असणं खूप महत्त्वाचं असतंच; पण मी उन्हाळ्यातही छत्री वापरते. मालिकेच्या निमित्ताने आता दररोज छत्री माझ्यासोबत आहे. त्यामुळे छत्री माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच झालीय.


Originally published at Marathi PR.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *