मराठी मालिकाही हिंदीच्या तोडीस तोड

‘नकुशी’चे सिनेमॅटोग्राफर बाळू दहिफळे यांचं मत

‘मराठी मालिकांमध्ये खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. सध्या मराठी मालिका हिंदीच्या तोडीस तोड काम करत आहेत,’ असं मत हिंदी टीव्ही मालिकांमध्ये लोकप्रिय सिनेमॅटोग्राफर असलेल्या बाळू दहिफळे यांनी व्यक्त केले आहे.

बाळू दहिफळे यांनी स्टार प्रवाहच्या ‘नकुशी’ या मालिकेचं छायांकन करून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. पैठणचे सुपुत्र असलेल्या बाळू दहिफळे यांनी आजवर मोह मोह के धागे, एक दुजे के वास्ते, तूमेरा हिरो अशा अनेक हिंदी मालिकांचं छायांकन केलं आहे.


सुरुवातीपासूनच लोकप्रिय ठरलेल्या ‘नकुशी’ मालिकेचं साताऱ्यात झालेलं अस्सल गावगाड्याचे चित्रीकरण किंवा मनाली नेत्रसुखद चित्रण ही त्यांच्याच कॅमेऱ्याची किमया. जवळपास १५ वर्षं या क्षेत्रात कार्यरत असूनही ‘नकुशी’ ही त्यांची पहिलीच मराठी मालिका आहे.

‘शशी सुमित प्रॉडक्शनसोबत मी हिंदीत काम केलं होतं. त्यांनीच या मालिकेची निर्मिती केली आहे. नकुशी या मालिकेचा विषयच मला वेगळावाटला. अशी काही प्रथा आपल्याकडे आहे, हेच मला माहीत नव्हतं. वेगळी कल्पना असल्यानं मला विचारणा झाल्यावर लगेच मी ही मालिका करायचं ठरवलं. दिग्दर्शक वैभव चिंचाळकरनं विषयाचा आणि मालिकेचा पूर्ण विचार केला होता. त्यामुळे कलाकारांचा लुक, छायांकनासाठीची प्रकाशयोजना याचाही मी नीट अभ्यास केला’ असं त्यांनी सांगितलं.

इतक्या वर्षांनी मराठी मालिका करण्याविषयी ते म्हणतात, ‘ मुळात काम करायचे ते मोजके पण दर्जेदार, त्यामुळे हिंदीत बरेच काम झाले,पण मराठीत हा योग येत नव्हता. त्याशिवाय अनेकांना वाटतं, की मी हिंदीत काम करतो म्हणजे खूप पैसे घेतो, आपल्याला कसं परवडणार… त्यामुळे फार ऑफर्सही नाही आल्या. उशीर झाला असे वाटत असले तरी नकुशीच्या वेगळेपणामुळे लोक त्याची जी दखल घेतली जाते आहे, त्याचे समाधान जास्त आहे.’

नुकतंच ‘नकुशी’चं चित्रीकरण मनाली इथं करण्यात आलं. त्या अनुभवाविषयी ते म्हणाले, ‘मनालीला चित्रीकरण करण्याचा फारच कमाल अनुभव होता. मात्र, तिथं जाऊन काम करणं प्रचंड अवघड होतं. मनालीला खूप थंडी होती. बर्फ पडत होता. काम करताना हात सुन्न व्हायचे. इतके, की हात आहेत की नाही हे कळत नव्हतं. उपेंद्र लिमये, प्रसिद्धी आयलवार हे कलाकारही थंडीनं गारठून जायचे. तरीही, आम्ही उत्तम पद्धतीनं चित्रीकरण केलं.’

दीर्घकाळ टेलिव्हिजन क्षेत्रात कार्यरत असूनही दहिफळे यांना मराठी मालिका वेगळ्या असल्याचं वाटतं. ‘मराठी मालिका सध्या हिंदीच्या तोडीस तोड काम करत आहेत. खूप वेगळे विषय हाताळले जात आहेत. खरंतर टेलिव्हिजन हे माध्यम जरा बटबटीत आहे. त्यामुळे त्याच्या मर्यादा आहेत. काही ठरलेली सूत्रं आहेत. या सगळ्यात ‘नकुशी’ वेगळी मालिका आहे, असं मी म्हणेन,’ असं त्यांनी सांगितलं.

अशी सापडली शेरनाझ!

स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’मध्ये शिविका तनेजा

स्टार प्रवाहवरील ‘नकुशी’ मालिकेत शेरनाझच्या एंट्रीनं कथानकाला वेगळं वळण मिळालं आहे. मात्र, शेरनाझच्या भूमिकेसाठीची निवड प्रक्रिया फारच गमतीशीर होती. बराच काळ शोध घेतल्यानंतर शेरनाझच्या भूमिकेसाठी शिविका तनेजाची निवड झाली. ग्लॅमरस असलेली शिविका ही भूमिका साकारते आहे.


मालिकेचा दिग्दर्शक वैभव चिंचाळकर आणि टीम शेरनाझच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीच्या शोधात होते. जवळपास २०पेक्षा जास्त अभिनेत्रींची या भूमिकेसाठी ऑडिशन घेण्यात आली. मात्र, कुणीही पसंत पडेना.
एके दिवशी अचानकपणे या भूमिकेसाठी इच्छुक असलेली शिविका नकुशीच्या सेटवर पोहोचली. तिचा आत्मविश्वास पाहून दिग्दर्शक वैभव चिंचाळकरने तिला ऑडिशनची संधी द्यायचे ठरवले. शिविका मुळची चंदीगडची. तिचं बालपण तिकडेच गेलं. तिला मराठी भाषेविषयी काहीच माहिती नव्हती. तरीही, सध्या एकंदर टीव्ही विश्वात बहुचर्चित असलेल्या ‘नकुशी’ या मालिकेच्या वेगळेपणामुळे ती या भूमिकेसाठी इच्छूक होती. तिचे लुक्स आणि आत्मविश्वास पाहून वैभव चिंचाळकरनं तिच्या चार पाच ऑडिशन्स घेतल्या. मराठी भाषा आणि कथानकाविषयी तिला नीट समजावल्यावर वैभवला अपेक्षित असलेली शेरनाझ तिच्यात दिसू लागली.

‘शिविकाच्या बोलण्यात सहजपणे येणारं हिंदी शेरनाझच्या भूमिकेसाठी योग्य होतं. त्याशिवाय तिनंही शेरनाझ ही व्यक्तिरेखा नीट समजून घेतली. ऑडिशननंतर ती शेरनाझ साकारू शकते याचा विश्वास वाटल्यानं तिची निवड केली’ असं वैभवनं सांगितलं. नकुशीत शेरनाझ आल्यानं आता बऱ्याच घडामोडी होणार आहेत. त्याला नकुशी कशी सामोरी जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

स्टार प्रवाहवर दर शनिवारी ‘तुफान आलंया’चं प्रसारण

सुपरस्टारपदावर विराजमान असूनही सामाजिक प्रश्नांचं भान असलेला अभिनेता आमीर खाननं महाराष्ट्रातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. सहजसोप्या पद्धतीनं दुष्काळमुक्ती करण्यासाठी ‘वॉटर कप’ या अनोख्या स्पर्धेच्या रुपानं चळवळ सुरू झाली. गेल्या वर्षी ३ तालुके आणि ११६ गावांमध्ये रंगलेली वॉटर कप स्पर्धा यंदा ३० तालुक्यांतील १३०० गावांमध्ये रंगणार आहे. दुष्काळाशी लढणाऱ्या या गावांचे प्रयत्न दाखवणारा ‘तुफान आलंया’ हा कार्यक्रम आता ‘स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे. दर शनिवारी रात्री ९.३० ते १०.३० या वेळेत हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे.


गेल्या वर्षी सामाजिक बांधिलकी जाणून स्टार प्रवाहने ‘पाणी वाचवा महाराष्ट्र घडवा’ या उपक्रमांतर्गत ‘महाराष्ट्र देशा’ हे गाणं सादर केलं होतं. आमीर खान, किरण राव, सी.इ.ओ. सत्यजित भटकळ आणि पाणी तज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ यांनी मिळून स्थापन केलेल्या पाणी फाउंडेशन पाया स्टार नेटवर्कनं सादर केलेल्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातून घातला गेला होता. त्यामुळे सामाजिक विकासासाठी स्टार नेटवर्कनं नेहमीच योगदान दिलं आहे. दुष्काळमुक्तीची चळवळ उभी करण्यासाठी पाणी फाउंडेशनने मागच्या वर्षी ‘वॉटर कप’ हा एक अनोखा उपक्रम राबवला.

पाणीटंचाईची सर्वाधिक समस्या असलेल्या महाराष्ट्रातील काही गावांची निवड करून या समस्येचे निवारण करण्यासाठीचे उपाय, सोपे मार्ग आणि सहज राबवता येईल असे तंत्र त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. याचा वापर करून दुष्काळमुक्त होणाऱ्या गावांना पारितोषिक देण्यात आलं. महाराष्ट्र शासनानेही यासाठी मदत केली. ही कल्पना यशस्वी ठरली. वॉटर कपला भरभरून प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राचा दुष्काळ मुक्त होण्याचं एक पाऊल पुढे पडलं. यंदा वॉटर कप अधिक व्यापक स्तरावर आयोजित करण्यात येत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील तालुक्यांचा स्पर्धेत समावेश असणार आहे. आठ आठवडे चालणाऱ्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ३० लाख रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी २० लाख रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. या शिवाय प्रत्येक तालुक्यातील सर्वोत्तम गावाला १० लाख रुपयांचं विशेष बक्षिस मिळणार आहे. यंदाच्या वॉटर कपचं वेगळेपण म्हणजे, मराठी सिनेसृष्टीतील सेलिब्रेटी विविध भागांचं प्रतिनिधित्त्व करणार आहेत. भारत गणेशपुरे, अनिता दाते विदर्भाचं, गिरीश कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर मराठवाड्याचं, सई ताम्हणकर, सुनील बर्वे पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्त्व करत आहेत. जितेंद्र जोशी सूत्रसंचालन करत आहे.

दुष्काळमुक्तीसाठी धडपडणाऱ्या या गावांच्या प्रयत्नांना आणि पाणी फाउंडेशनच्या कामाला आपणही बळ द्या… स्टार प्रवाहवर आवर्जून पहा ‘तुफान आलंया…’ दर शनिवारी रात्री ९.३० ते १०.३० वाजता.

अमेय आणि आकाश आमने-सामने

गेल्याच वर्षी ‘सैराट’ या सिनेमातून संपूर्ण महाराष्ट्रभर कौतुक झालेला आकाश ठोसर महेश मांजरेकर यांच्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे, हे तर सगळ्यांना माहीत आहेच. या सिनेमाचं शूट तसं पूर्ण झालेलं आहे. या सिनेमाबद्दल सलमान खानने ट्विट देखील केलेले आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘ध्यानीमनी’ चित्रपटाला बॉलिवूडमधील कलाकार अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. आता पुन्हा एकदा सलमान खानने महेश मांजरेकर यांचं कौतुक केलं आहे. पण यावेळी त्यांच्या ‘एफयु’ या चित्रपटाच्या संबंधित कौतुक केले आहे. सलमानने ट्विटरवर ‘एफयु’ मधील गाण्याविषयी ट्विट केलेलं तर होतच पण आता त्याने या सिनेमाची तारिख देखील घोषित केली आहे.


तर दुसरीकडे अमेय वाघच्या ‘मुरांबा’ या सिनेमाची चर्चा सर्वत्र आहे. सध्याच रंजीत गुगले यांनी सोशल मिडियावर ‘मुरंबा’ या सिनेमाचे नवं कोर पोस्टर प्रदर्शित केले आहे. ‘घंटा’ चित्रपटाच्या यशानंतर दशमी स्टुडियोज ‘मुरांबा’ या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मनोरंजक चित्रपटाची निर्मिती करणार आहे. तसेच त्यांच्यासह हयुज प्रॉडक्शन्स, प्रतिसाद प्रॉडक्शन्स प्रस्तुत हा नवा कोरा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अमेय आणि आकाशचा फॅन क्लब प्रचंड मोठा आहे. यावर्षी या दोघांचे बहुप्रतिक्षित सिनेमे प्रदर्शित होत अाहे. 2 जूनला मुरांबा आणि एफ यू असे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने त्याचा फटका बॉक्स ऑफिसवर बसेल की काय यात शंका आहे.


मराठी सिनेसृष्टीत सध्या वेगवेगळ्या विषयांवर हात घातला जात आहे. सिनेमांच्या नावाचं म्हणाल तर भन्नाट नावं आजकाल सिनेमांना दिली जात आहे. मराठी सिनेमांच्या कथा, पटकथा, संवाद, सिनेमॅटोग्राफी याकडे प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता बघू या दोन सिनेमामधून प्रेक्षक कोणत्या सिनेमाला पसंती कळवतात ते…

आलोक आणि इंदूची फिल्म डेट

आपल्या देशात क्रिकेट म्हणजे धर्म आणि सचिन म्हणजे देव आहे. आता जर आराध्यदेवता सचिनवर चित्रपट येणार असेल तर मग भक्तांची उत्सुकता काही विचारता सोय नाही. मग ‘मुरांबा’चे आलोक आणि इंदू म्हणजेच अमेय वाघ आणि मिथिला पालकर तरी कसे मागे राहतील.


नुकताच त्यांनी ‘सचिन सर पहिला मान तुमचाच’ म्हणत ‘सचिन, द बिलिअन ड्रीम्स’ या चित्रपटाच्या पोस्टरसोबत फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. आणि प्रेक्षकांच्या भेटीला ‘मुरांबा’ २ जूनला येणार आहे कारण २६ मेला ते सुद्धा ‘सचिन’ बघायला जाणार असल्याचंही सांगायला ते विसरले नाहीत.

आकाशचा ‘FU — दोस्तीसाठी कायपन’ मधील कूल लूक

महेश मांजरेकरांचा बहुचर्चित आगामी ‘F.U.’ या चित्रपटाचे टीजर पोस्टर बॉलिवुड सुपरस्टार आणि महेश मांजरेकरांचा खास मित्र सलमान खान याने ट्वीट केले होते आणि त्यासोबत असे पण लिहिले होते की, आकाश ठोसरला भेटा १४ एप्रिलला. अखेर, आकाश ठोसरचा ‘एफ यु’ चित्रपटातील लूक पाहायला मिळालाच.


आकाश ठोसरचा लूक एकदम स्टायलिश आहे आणि त्याच्या हातामध्ये फॅशनेबल लेदरचे ब्रेसलेट आणि तरुणांचे फेव्हरेट लेदर जॅकेट दिसत आहे. आकाश ठोसरच्या फर्स्ट लूकचे ट्विट पण खुद्द सलमान खान याने केले.


‘एफ यु’ हा भन्नाट नावाचा भन्नाट चित्रपट, २ जूनला प्रदर्शित होईपर्यंत, सोशल मिडियावरील या चित्रपटाच्या भन्नाट पोस्ट्स पाहण्याची आणि शेयर करण्याची सगळ्यांना जबरदस्त उत्सुकता नक्कीच असेल.

ललित आणि नेहा यांच्या TTMM चे टीझर पोस्टर रिलीज

आपल्या सर्वांचे आवडते कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांच्यामध्ये चाललेल्या कोल्ड वॉरचं कोडं त्यांच्या सर्व चाहत्यांना पडलेलं पण त्याचा शेवट त्यांच्या आगामी चित्रपट TTMM (तुझं तू माझं मी) च्या टिझर पोस्टर रिलीजने झाला.


ललित आणि नेहा यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणे ही त्यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असणार आहे. कुलदीप जाधव दिग्दर्शित आणि मीरा एंटरटेनमेंट व वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत TTMM चित्रपटामधील नेहा आणि ललितची धमाल जोडी सर्व रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. मीरा एंटरटेनमेंट आणि वैशाली एंटरटेनमेंट यांनी याआधी ‘मुंबई पुणे मुंबई’ आणि ‘प्रेमाची गोष्ट’ या चित्रपटांची मेजवानी प्रेक्षकांना दिली होती. TTMM चा टिझर पोस्टर चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढवेल यात शंकाच नाही. डॉ. संतोष सवाणे निर्मित TTMM हा चित्रपट १६ जून २०१७ रोजी प्रदर्शित होणार आहे.