‘पार्टी’चा टीजर पोस्टर प्रदर्शित


आपल्या आशयसमृद्ध लेखणीतून ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुप्रसिद्ध चित्रपटांची मुहूर्तमेढ रोवणारे, सुप्रसिद्ध कथा पटकथा लेखक सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. ‘पार्टी’ असे या सिनेमाचे नाव असून, येत्या ऑगस्ट महिन्यात २४ तारखेला सचिन दरेकरांच्या या धम्माल पार्टीचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. नुकताच या सिनेमाचा सोशल नेटवर्किंग साईटवर टीझर पोस्टर लाँँच करण्यात आला.


नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि सुपरहिट ‘बकेट लिस्ट’ सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रॉडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर, जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या ‘पार्टी’ या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहऱ्यांचा समावेश आहे. मात्र, या कलाकारांचे चेहरे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या टीझर पोस्टरवर लपवण्यात आली असल्यामुळे, याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.


Originally published at Marathi PR.

शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा ‘शिक्षा’ लघुपट


‘शिकाल तर टिकाल’ हे कुणीतरी उगाच नाही म्हणून ठेवलंय. ‘शिक्षण’ हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे. शिक्षणामुळे प्रत्येकासाठी नवी क्षितिजं खुली होतात, शिक्षण आपल्याला जगण्याचं नवं बळ आणि स्वतःची नवी ओळख निर्माण करण्याचं सामर्थ्य देतं. अशा या शिक्षणाचं महत्व अधोरेखित करणारा ‘शिक्षा’ हा लघुपट लवकरच आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.


‘कलाश्री इंटरटेनमेंट’ निर्मित ‘शिक्षा’ या लघुपटाचे पोस्टर आणि ट्रेलर नुकतेच लॉन्च झाले असून त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या लघुपटातून ‘गाव गाता गाजली’ फेम बालकलाकार सार्थक वाटवे एका नव्या रूपात आपल्या समोर येत आहे. या मालिकेत क्रिशच्या भूमिकेत दिसलेला सार्थक या लघुपटात प्रमुख आणि एका वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे.


आपण नेहमीच आपल्या आजूबाजूला काही गरीब मुलांना काम करताना पाहतो, जसे रस्त्यावर वृत्तपत्र आणि खेळणी विकणे, बूट पॉलिश करणे, कचरा आणि प्लास्टिक किंवा भंगार गोळा करणे अशी कामे करताना अनेक लहान मुले आपल्या नजरेस रोज पडत असतात. त्यावेळी आपण त्यांना काही खाद्यपदार्थ, पैसे किंवा आपल्या मुलांनी वापरलेले जुने कपडे देऊ करतो. पण आपण त्यांच्या शिक्षणाच्या मूलभूत गरजेचा विचार कधी करतो का? तर नाही. हिंदी मध्ये ‘शिक्षा’ म्हणजे शिक्षण आणि मराठीमध्ये ‘शिक्षा’ म्हणजे दंड . त्या मुलांची गरज आणि आपण केलेली मदत लक्षात घेता या दोन वेगवेगळ्या भाषेतील एकाच शब्दाच्या दोन अर्थांचे केलेले चित्रण म्हणजे हा लघुपट.

कलाश्री इंटरटेनमेंट’ निर्मित ‘शिक्षा’ या लघुपटाचे दिग्दर्शन राष्ट्रपाल प्रकाश काकडे यांनी केले असून निर्मिती महेश महादेव कांबळे तर संगीत सुहास सुरेश भोसले आणि संजय शेलार तसेच सहाय्यक छायाचित्रकार अक्षय पाटील यांनी केले आहे. या लघुपटात सार्थक वाटवे सोबतच योगिता पाखरे व संतोष सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. लघुपटाचा एकंदर विषय हा समाजातील एका अत्यंत संवेदनशील मुद्द्याला हात घालणारा असल्याने हा लघुपट प्रेक्षकांची मने जिंकण्यात नक्कीच यशस्वी ठरेल यात शंका नाही.


Originally published at Marathi PR.

नम्रता प्रधान कशी झाली ‘छत्रीवाली’


स्टार प्रवाहवर १८ जूनपासून सुरु होणाऱ्या ‘छत्रीवाली’ या मालिकेतून नम्रता प्रधान हा नवा चेहरा छोट्या पडद्यावर दाखल झाला आहे. साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या आणि स्वत:सोबत नेहमी छत्री बाळगणाऱ्या मधुराची व्यक्तिरेखा नम्रता साकारत आहे. या मालिकेच्या निमित्ताने नम्रताशी साधलेला संवाद…


छत्रीवाली ही तुझी पहिलीच मालिका, या मालिकेसाठी तुझी निवड कशी झाली?

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड आहे. या मालिकेसाठी ऑडिशन सुरु असल्याचं मला समजलं आणि मी ऑडिशनसाठी फोटो पाठवले होते. त्यात माझी निवड झाल्यानंतर दोनवेळ लूक टेस्ट झाली. तो लूक योग्य वाटला सगळ्यांना आणि अपेक्षित असणारी छत्रीवाली त्यांना माझ्यात सापडली. छत्रीवालीमुळे माझं अभिनयाचं स्वप्न पूर्ण होतंय असंच म्हणावं लागेल.

मालिकेतली मधुरा आणि तुझ्या व्यक्तिमत्त्वात काही साम्य आहे? ही व्यक्तिरेखा साकारताना अभिनेत्री म्हणून काय विचार करतेस?

आमच्यात खूपच साम्य आहे. मधुरा आणि मी जवळपास सारख्याच आहोत असंही म्हणता येईल. कारण, मी माझ्या कुटुंबाशी खूप घट्ट आहे. मधुरा कोणताही निर्णय विचार करून घेते, तसंच माझंही आहे. मधुरा जितकी कॉन्फिडंट आहे, तशीच मीही आहे. त्यामुळे माझ्यासाठी मधुरा वेगळी नाहीच. ही व्यक्तिरेखा साकारताना मला वेगळं असं काहीच करावं लागत नाही.


या मालिकेत तुझ्याबरोबर अनुभवी कलाकार आहेत, या सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे?

खूपच मस्त… आम्ही सगळे सेटवर खूप मजा करतो. त्यामुळे सेटवरचं वातावरण छान राहातं. सगळेजण ते वातावरण एंजॉय करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, आम्ही प्रत्येक सीनची रिहर्सल करतो. त्यामुळे सीन करताना सोपं जातं. त्याशिवाय सगळे सीनियर्स मला सांभाळून घेतात, मी चुकत असेन तर सांगतात. त्यामुळे मलाही दडपण येत नाही. आता या सगळ्यांबरोबर माझी छान केमिस्ट्री तयार होतेय.

स्टार प्रवाहनं आजपर्यंत अनेक नव्या कलाकारांना संधी दिली, त्यात आता तुझंही नाव आलंय, कसं वाटतंय?

स्टार प्रवाहच्या मालिकेतून माझं पदार्पण होणं हे माझं भाग्य आहे. अनेक कलाकारांचं करिअर स्टार प्रवाहवरच सुरू झालं होतं. स्टार प्रवाहची क्रिएटिव्ह टीम, आमचे निर्माते, दिग्दर्शक सगळ्यांशीच माझं छान नातं झालं आहे.

मधुराचं आणि छत्रीचं एक नातं आहे, तुझ्यासाठी छत्री किती खास आहे?

मला स्वतःला छत्री आवडतेच. पावसाळ्यात छत्री सोबत असणं खूप महत्त्वाचं असतंच; पण मी उन्हाळ्यातही छत्री वापरते. मालिकेच्या निमित्ताने आता दररोज छत्री माझ्यासोबत आहे. त्यामुळे छत्री माझ्या आयुष्याचा अविभाज्य भागच झालीय.


Originally published at Marathi PR.

‘शतदा प्रेम करावे’मध्ये रंगणार महानाट्य


स्टार प्रवाहच्या ‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेत एक वेगळं वळण आलं आहे. सायली आणि उन्मेषच्या नात्यात रोहनच्या रुपानं एक अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सायली आणि रोहनचं होणारं लग्न उन्मेष थांबवू शकेल का याची उत्सुकता निर्माण झाली आहे.


सायलीला मिळवण्यासाठी रोहन कोणत्याही थराला जायला तयार आहे. म्हणूनच आपल्याबरोबर लग्न न केल्यास उन्मेषला उध्वस्त करण्याची धमकी रोहन सायलीला देतो. सायली घाबरून रोहन बरोबर लग्न करण्यास राजी होते. मात्र, सायली आपल्याला का सोडून गेली, याचं कारण उन्मेषला कळत नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या उन्मेषला खरं कारण कळेल का आणि सायली-रोहनचं लग्न तो थांबवू शकेल का, या प्रश्चाचं उत्तर प्रेक्षकांना महाएपिसोडमध्ये मिळणार आहे.


‘शतदा प्रेम करावे’ या मालिकेतलं हे नाट्य आता टिपेला पोहोचलं आहे. त्यामुळे न चुकता पहा ‘शतदा प्रेम करावे’चा महाएपिसोड रविवारी, १७ जूनला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर!




Originally published at Marathi PR.

स्टार प्रवाहवर येतेय ‘छत्रीवाली’


स्टार प्रवाहने आजवर आपल्या मालिकांतून वेगवेगळी कथानकं सादर केली आहेत. उत्तम कलाकार, दर्जेदार निर्मितीमूल्यं आणि नवा आशय मांडणारी गोष्ट हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वैशिष्ट्य आहे. असाच एक वेगळा विषय घेऊन स्टार प्रवाह प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे. ‘छत्रीवाली’… नाव जितकं हटके आहे तितकीच हटके आहेत यातली पात्रसुद्धा…


ही गोष्ट आहे आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम. योगायोगाने विक्रमच्याच ऑफिसमध्ये मधुराणीला जॉबची ऑफर मिळते. आपल्या तालावर मधुराणीला नाचवू पाहणा-या विक्रमला मधुराणी शरण जाते की त्यालाच सरळ करते? नात्याच्या छत्रीखाली या दोघांचं नातं बहरतं का अश्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधायची असतील तर छत्रीवाली ही मालिका पाहायलाच हवी.

मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी पहायला मिळणार आहे. संकेत पाठकनं या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती. तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे. या मालिकेच्या प्रोमोजनी सोशल मीडियामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे.

तेव्हा ही नवी गोष्ट पाहण्यासाठी सज्ज व्हा.. त्यासाठी १८ जूनपासून न चुकता पहा छत्रीवाली, सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.


Originally published at Marathi PR.

‘झिपऱ्या’चा म्युझिक आणि ट्रेलर लाँच


पत्रकारिता आणि साहित्य अशा दोन्ही क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे आणि जगातील साम्यवादी क्रांतीचा इतिहास अत्यंत सोप्या शब्दांत मराठी वाचकांपर्यंत पोहोचविणारे ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध कादंबरीवर आधारित ‘झिपऱ्या’ चित्रपट येत आहे. ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित व सहनिर्माता अथर्व पवार क्रिएशन्स तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित, प्रेरणादायी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात पार पडला.


मुंबईसह अनेक मोठ्या रेल्वे स्टेशनवर आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी किशोरवयीन मुले बघितली असतील. ‘झिपऱ्या’ चित्रपट अशाच मुलांच्या भोवती फिरणारा आहे. यामध्ये रेल्वे स्टेशनवर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाचा अंधारातून प्रकाशाकडे जाणारा प्रवास मांडण्यात आलेला आहे. सभोवतालची परिस्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी सुद्धा भविष्याबाबत तो निराश नाही. दरम्यान, या जगण्याच्या संघर्षात झिपऱ्याला पोलिसांची भीती का वाटू लागते? झिपऱ्या आपल्या बहिणीच्या लग्नाच्या टेन्शन मध्ये नेमकं काय काय करतो? असे अनेक प्रश्न या चित्रपटात पडतात, या कथेत असलेलं एक गूढ आणि त्या भोवती घेरलेलं झिपऱ्या चं आयुष्य आहे. तर दुसऱ्या बाजूला दारिद्र्य, हालअपेष्टा यांच्यावर मात करून स्वतःसह मित्रांच्या आयुष्यात सोनेरी रंग भरण्यासाठी तो धडपड करत आहे. वास्तवदर्शी चित्रीकरण, वेगवान कथानक आणि आयुष्याकडे पहाण्याची सकारात्मक दृष्टी देणाऱ्या ‘झिपऱ्या’ बद्दलची उत्कंठा या ट्रेलर मधून अधिकच वाढली आहे.

अश्विनी दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ची निर्मिती रणजीत दरेकर यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन केदार वैद्य यांचे आहे. यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे.


‘झिपऱ्या’चे एक खास वैशिष्ट्ये म्हणजे या चित्रपटाचे पार्श्वसंगीत ज्येष्ठ पर्कशनिस्ट तौफिक कुरेशी यांनी दिले आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय — अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत. तीन राज्य पुरस्कारांची मोहोर उमटलेला ‘झिपऱ्या’ येत्या २२ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


Originally published at Marathi PR.

सुबोध-श्रुतीचे ‘शुभ लग्न सावधान’


मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री श्रुती मराठे, पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. फ्रेम्स इन मोशन प्रोडक्शन निर्मित ‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाद्वारे ही जोडी प्रेक्षकांसमोर येत आहे. समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित या सिनेमाचे सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकतेच पोस्टर लाँँच करण्यात आले. ‘शुभ लग्न सावधान’ असे या सिनेमाचे शिर्षक लक्षात घेता, हा सिनेमा लग्नसंस्थेवर आधारित असल्याचा अंदाज येतो. दुबईत चित्रीकरण करण्यात आलेल्या या सिनेमाच्या पोस्टरवर सुबोध आणि श्रुती झळकत असून, या दोघांची सुंदर प्रेमकहाणी यात दाखवली जाणार असल्याची जाणीव देखील होते.


पल्लवी विनय जोशी यांची निर्मिती असलेला हा कौटुंबिक सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होत असून, प्रेक्षकांना यात आशयघन मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. त्यामुळे तब्बल दोन वर्षानंतर एकत्र येत असलेल्या सुबोध-श्रुतीच्या चाहत्यांसाठी ‘शुभ लग्न सावधान’ हा सिनेमा खूप खास ठरणार आहे, हे निश्चित !


Originally published at Marathi PR.

स्टार प्रवाहवर अनुभवा तडका मराठी मनोरंजनाचा


मराठी नाटक, चित्रपट, टीव्ही मालिकांतील सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि सेलिब्रेटींचे धमाल परफॉर्मन्सेस असलेला संस्कृती कला दर्पण पुरस्कार सोहळा स्टार प्रवाहवर १० जूनला दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. हा मराठी मनोरंजनाचा तडका नक्की अनुभवावा असाच आहे.


अर्चना नेवरेकर फाऊंडेशनतर्फे आयोजित संस्कृती कला दर्पण सोहळ्यात यंदाही चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिका क्षेत्रातील सर्वोत्तम कलाकृतींचा सन्मान करण्यात आला. मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर कलाकारांची मांदियाळी या सोहळ्याला लोटली होती. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांना कलागौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मराठी मनोरंजन क्षेत्राकडून मिळालेला हा पुरस्कार स्वीकारताना ते भावूक झाले होते. सई देवधर, गश्मीर महाजनी आणि मानसी नाईकच्या दमदार परफॉर्मन्सने या सोहळ्याची रंगत आणखी वाढवली.


Originally published at Marathi PR.

‘पिप्सी’ प्रेक्षकांच्या भेटीला २७ जुलैपासून


वजनदार,राज्य पुरस्कार प्राप्त रेडू, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त रिंगण, गच्ची असे एकसे बढकर एक विषय असलेले चित्रपट मराठी सिनेसृष्टीला देणाऱ्या लॅन्डमार्क फिल्म्सचा ‘पिप्सी’ हा सिनेमा २७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच पोस्टर लाँँच करण्यात आला. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित या सिनेमाच्या पोस्टरवर एक लहान मुलगा आणि मुलगी आपल्याला दिसून येतात. ग्रामीण भागातील या दोन लहानग्यांच्या मैत्रीवर हा सिनेमा बेतला असल्याचा अंदाज ‘पिप्सी’चा पोस्टर पाहताना येतो. यावर्षीच्या राज्य पुरस्कार सोहळ्यांमध्ये विशेष मोहोर उमटवणारा हा सिनेमा येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


या सिनेमात मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी हे दोन बालकलाकार प्रमुख भूमिकेत असून, यापूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या टीझरमध्ये देखील ते आपणास दिसून आले आहेत. विशेष म्हणजे, यंदाच्या ५५ व्या राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये मैथिली पटवर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित या सिनेमात लहान मुलांची निरागसता टिपण्यात आली असून, वास्तविक आयुष्यात घडत असलेल्या घडामोडींमधून त्यांनी काढलेला निष्कर्ष आपल्याला पाहता येणार आहे.

दर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला हा सिनेमा राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडत आहे. २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.ई या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या सिनेमाची निवड झाली होती. तसेच आगामी बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीदेखील ‘पिप्सी’ चित्रपटाचा समावेश झाला आहे. इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी महोत्सवात आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलच्या बाल आणि तरुण वर्गासाठी देण्यात येणाऱ्या स्पर्धेच्या यादीतही ‘पिप्सी’ चित्रपटाने स्थान मिळवले आहे. अशाप्रकारे एक हटके विषय घेऊन सर्वत्र आपली मोहर उमटवणारा हा सिनेमा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील ‘पिप्सी… अ बॉटल फूल ऑफ होप’ असं म्हणत आपलंसं करण्यास लवकरच येत आहे.


Originally published at Marathi PR.

“लेथ जोशी”चे पोस्टर लाँच


आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरण यांच्या अपरिहार्य अशा घोंगावणाऱ्या वादळाने जगभरातला कामगार वर्गाला वेढलं आहे. कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. काळाच्या ओघात कौशल्याची साधनं आणि त्याच्याशी जोडलेल्या भावनाही लोप पावतात. ही निरंतन प्रक्रिया आहे. “लेथ जोशी” या चित्रपटात लेथ या यंत्राशी जोडलेली कथा मांडण्यात आली असून १३ जुलैला हा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे.


अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने हा चित्रपट प्रस्तुत केला असून प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सत्यजित श्रीराम यांनी सिनेमॅटोग्राफी तर मकरंद डंभारे यांनी संकलन म्हणून काम पाहिले आहे. नुकतेच या चित्रपटाचे एक स्पेशल स्क्रीनिंग पुणे येथे महाराष्ट्राच्या विविध कोपऱ्यातून आलेल्या आयटी क्षेत्रातीतील मान्यवर मंडळींसाठी करण्यात आले होते, यावेळी या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.या चित्रपटाचा विषय हा खूपच वेगळा असून मनाला भिडणारा आहे. सत्य परिस्थितीवर हा चित्रपट भाष्य करतो. यंत्र आणि माणूस यांच्यातलं नातं अधोरेखित करण्याचा हा वेगळा प्रयत्न असून प्रेक्षकांनाही हा चित्रपट नक्कीच आवडेल अशी आशा चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते अमोल कागणे यांनी व्यक्त केली.


आजच्या कॉम्प्युटरच्या युगात अनेक जुनी यंत्र, त्यावर काम करणारे कामगार कालबाह्य झाले आहेत. अशा काळात लेथ या यंत्राची आठवण करून देणारा, त्या यंत्राशी जोडलेल्या भावनांना उजाळा देणारी कथा लेथ जोशी या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे, ‘ असं दिग्दर्शक मंगेश जोशी यांनी सांगितलं. या चित्रपटाने जगभर १२ आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून, २० आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची निवड झाली आहे.


Originally published at Marathi PR.