सस्पेन्स, थ्रिलर ‘मस्का’ १ जूनपासून प्रदर्शित


धम्माल विनोदासह सस्पेन्स आणि थ्रीलरचा तडका असलेल्या अमोल जोशी प्रोडक्शन्स व स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित आगामी ‘मस्का’ या मराठी चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच मुंबई येथे दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला.अभिनेता, नाट्य दिग्दर्शक अशी ओळख असलेला प्रियदर्शन जाधव ‘मस्का’ मधून चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. या सोहळ्याला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे, अनिकेत विश्वासराव, चिन्मय मांडलेकर, प्रणव रावराणे, शशांक शेंडे आणि विद्याधर जोशी, संगीतकार चिनार आणि महेश, गायक महालक्ष्मी अय्यर, अवधूत गुप्ते, गणेश चंदनशिवे, गीतकार मंगेश कांगणे, व्हीडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी, निर्माते प्रशांत पाटील, प्रस्तुतकर्ते सचिन नारकर, विकास पवार, आकाश पेंढारकर, विनोद सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

‘मस्का’ चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये अनिकेत विश्वासराव हा काहीसा हतबल दिसत असून शशांक शेंडे हे कधी चिंतीत तर कधी नाट्यमय प्रसंगात दिसत आहेत, तर प्रणव रावराणे हा एका स्पेशल चाईल्ड असल्याचे दिसते. तसेच चिन्मय मंडलेकर पहिल्यांदाच विनोदी शैलीत दिसणार आहे, आजवर अनेक चित्रपटातून सोज्वळ भूमिका साकारणारी अभिनेत्री .प्रार्थना बेहेरे प्रथमच हटके अशा बोल्ड अंदाज मध्ये पडद्यावर आपल्याला बघायला मिळेल. तिचा हा हटके अंदाज सर्वांनाच भुरळ पाडतोय.

चित्रपटाच्या ट्रेलर सोशल मिडीयावर उत्तम प्रतिसाद मिळाला असून ‘मस्का’ चित्रपटातील गाणी देखील अत्यंत लोकप्रिय झाली आहेत. गणेश चंदनशिवे यांनी गायलेले ‘बया’ गाणे तरुणाईने चांगलेच डोक्यावर घेतले आहे तर ‘चला पटकन पकडा पोकेमॉन’ या गाण्याचीही तरुणाईला भुरळ पडल्याचे दिसते.

मोरेश्वर प्रॉडक्शन्स निर्मित, अमोल जोशी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप रिक्रिएशन्स अँड मिडिया प्रा. ली. प्रस्तुत ‘मस्का’ चे प्रशांत पुरुषोत्तम पाटील निर्माते आहेत, तर प्रस्तुतकर्ता सायली जोशी,सचिन नारकर, विकास पवार आणि सह प्रस्तुतकर्ता आकाश पेंढारकर आणि विनोद सातव आहेत. अत्यंत हटके विषयावरील सस्पेन्स, थ्रीलर आणि कॉमेडी असा मनोरंजनाचा फुल टू तडका असलेला ‘मस्का’ हा चित्रपट येत्या १ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


Originally published at Marathi PR.

बहुचर्चित ‘झिपऱ्या’चा टीझर प्रदर्शित


ए.आर.डी. प्रॉडक्शन्स आणि दिवास् प्रॉडक्शन्स निर्मित तसेच अश्विनी रणजीत दरेकर प्रस्तुत ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ख्यातनाम साहित्यिक, पत्रकार अरुण साधू यांच्या सुप्रसिद्ध ‘झिपऱ्या’ कादंबरीवर आधारित या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले आहे.

मुंबईतील रेल्वे स्टेशन जवळ आपण अनेकदा बूट पॉलिश करणारी मुले बघितली असतील. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुले प्रचंड मेहनत करतात. अशाच युवकांची कथा ‘झिपऱ्या’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यामध्ये रेल्वे स्थानकावर बूट पॉलीश करणाऱ्या एका तरुणाची कैफियत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आयुष्यातील समस्यांचा गुंता सोडविण्यासाठी प्रयत्न करत असताना वाट्याला येणारी उपेक्षा यावर यातून भाष्य केल्याचे दिसते. तसेच ‘हम वो जुते है, जो जमी पे होते है, पर तारे छुते है’ या गाण्यातून या मुलांची धम्माल मस्तीही दिसत आहे. यामुळे चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे.

अरुण साधूंच्या कादंबरीवर आधारीत पटकथा आणि चित्रपटाचे दिग्दर्शन केदार वैद्य यांनी केले असून यामध्ये चिन्मय कांबळी, प्रथमेश परब, सक्षम कुलकर्णी, अभिनेत्री अमृता सुभाष, अमन अत्तार, देवांश देशमुख, नचिकेत पूर्णपात्रे, प्रवीण तरडे, विमल म्हात्रे, दीपक करंजीकर अशी कलाकारांची तगडी फौज आहे. या चित्रपटाला समीर सप्तीसकर, ट्रॉय-अरिफ यांनी संगीत दिले असून अभिषेक खणकर, समीर सामंत यांनी गीते लिहिली आहेत. कला दिग्दर्शक विनायक काटकर, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव तर डीओपी राजेश नादोने आहेत.

दरम्यान, ‘झिपऱ्या’ या चित्रपटाला ५५ व्या राज्य पुरस्कारात तीन पुरस्कारांनी गौरविण्यात आले असून यामध्ये सर्वोत्कृष्ट संकलन देवेंद्र मुर्डेश्वर, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक विनायक काटकर आणि सर्वोत्कृष्ट वेशभूषा प्रकाश निमकर यांचा समावेश आहे. ‘झिपऱ्या’ येत्या २२ जुन रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

पहा ‘झिपऱ्या’ या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर –


Originally published at Marathi PR.

‘मंकी बात’च्या ‘हाहाकार…’ ला पसंती


निष्ठा प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या बहुचर्चित ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटातील ‘हाहाकार…’ गाणे नुकतेच युट्युबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. चित्रपटाच्या टीझरला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आता ‘हाहाकार…’ या गाण्याला सुद्धा उन्हाळ्याच्या सुट्टीत बच्चेकंपनीची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत असल्याचे दिसते.

‘मंकी बात’ च्या निमित्ताने मराठीमध्ये बऱ्याच कालावधी नंतर एक बालचित्रपट येत आहे.

ही गोष्ट हसणारी.. रूसणारी …! ही गोष्ट खोडीची… नात्यातल्या गोडीची !! ही गोष्ट आहे माणसातल्या माकडाची… आणि माकडातल्या माणसाची! ही गोष्ट आहे घरातल्या बिलंदर माकडांना घेऊन सहकुटुंब बघण्याची!

‘हाहाकार…’ या धम्माल मस्तीने भरलेल्या गाण्यात बाल कलाकार वेदांत हा विविध प्रकारच्या खोड्या काढताना दिसतो आहे. गाण्यातील ओळी प्रमाणेच ‘माणसा मधील माकड करते भूभूत्कार’ असे माकड चाळे करताना तो आपल्याला वारंवार दिसतो आहे. शाळेतले गुरुजी, विद्यार्थी आणि सोसायटीतील म्हाताऱ्या व्यक्ती देखील त्याच्या खोडयांपासून वाचलेले नाहीत, असे या गाण्यात दिसते. ‘हाहाकार…’ हे गाणे शुभंकर कुलकर्णी याने गायले आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी यापूर्वी अनेक दर्जेदार चित्रपट बनवले आहेत. त्यांची ही कलाकृती लहानग्यांना खास उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमधली मेजवानी ठरणार आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने यांनी केली आहे तसेच चित्रपटाला संदीप खरे यांची गीते व संवाद आणि डॉ. सलील कुलकर्णी यांचे संगीत लाभले आहे.

चित्रपटात बाल कलाकार वेदांत सह पुष्कर श्रोत्री आणि भार्गवी चिरमुले प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच एक प्रसिद्ध कलाकार वेगळ्या भूमिकेतून आपल्याला सरप्राईज देण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांनी लिहिली आहे. धम्माल विनोदी असणारा ‘मंकी बात’ हा बालचित्रपट उन्हाळ्याच्या सुट्टीत येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील बच्चेकंपनीला भेटायला येणार आहे.


Originally published at Marathi PR.

प्रेमाची ‘रॉमकॉम’ गोष्ट लवकरच येणार पडद्यावर


चित्रपटसृष्टीत प्रेम ही संकल्पना अजरामर आहे. आजवर याच संकल्पनेवरचे कितीही चित्रपट आले असले तरी प्रत्येक चित्रपटातून प्रेमाकडे वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जातं. आता ‘रॉमकॉम’ हा चित्रपटही प्रेमाचा वेगळ्या पद्धतीनं शोध घेणार आहे.

नुकताच मुंबईत या चित्रपटाचा दिमाखदार मुहूर्त करण्यात आला. लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी आणि किशोर कदम यांच्या हस्ते हा मुहूर्त संपन्न झाला. ‘ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट’ या आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून सचिन शिंदे ‘रॉमकॉम’ हा चित्रपट करत आहेत. सुशील शर्मा सहनिर्माता आहेत. वेगळ्या संकल्पना, वेगळे विषय हाताळणारे गोरख जोगदंडे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. निर्माता सचिन शिंदे यांनी पूर्वी अनेक जाहिराती, मालिका, चित्रपटांसाठी कास्टिंग डिरेक्टर म्हणून काम केलं आहे. आता ते रॉमकॉम चित्रपटाद्वारे निर्मितीमध्ये पदार्पण करत आहे.


रॉमकॉम या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. चित्रपटांसाठी वेडा असलेला राहुल आणि सुसंस्कृत घरातली सुमन यांच्यातलं प्रेम यशस्वी होतं का, सुमनला मिळवण्यासाठी राहुलला काय काय करावं लागतं हे मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या व्यतिरिक्त अनेक सुखद धक्का देणाऱ्या गोष्टी या चित्रपटात असून त्याचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.

‘रॉमकॉम’ या चित्रपटाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या बावनकशी अभिनयाने चित्रपटांना वेगळी उंची प्राप्त करून देणारे अभिनेते किशोर कदम आणि सैराट तसेच सध्या न्यूड मधल्या भूमिकेमुळे चर्चेत असलेल्या अभिनयसंपन्न छाया कदम या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. त्यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे, स्वाती पानसरे, मृदुला वैभव सहकलावंत आहेत. युवा अभिनेता सारंग दोशी आणि मधुरा वैद्य ही जोडी या चित्रपटाद्वारे पदार्पण करते आहे. मृदुला वैभव क्रिएटिव्ह हेड असून, शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. अनिकेत करंजकर सिनेमॅटोग्राफी आणि साजन पटेल संगीत दिग्दर्शन करत आहेत.

‘बरीच वर्षं हिंदीत काम करूनही मराठी भाषा, चित्रपटांविषयी आपुलकी मनात होती. म्हणून पहिला चित्रपट मराठीमध्ये करतो आहे. ‘रॉमकॉम’ ही एक धमाल गोष्ट आहे. वेगळीच प्रेमकहाणी या चित्रपटातून अनुभवायला मिळेल’, असं निर्माता सचिन शिंदे यांनी सांगितलं.


Originally published at Marathi PR.

११ मे रोजी सगळे म्हणणार ‘लग्न मुबारक’


‘लग्न मुबारक’ काय? गोंधळलात नां? शादी मुबारक असंच म्हणायला हवं का? या प्रश्नावर सर्वांचेच उत्तर सहाजिकच ‘हो’ असे येईल. पण आता वेळ आली आहे ‘लग्न मुबारक’ असंच म्हणण्याची ते का? या प्रश्नाचं उत्तर येत्या ११ मे २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अभय पाठक प्रॉडक्शन्स सह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटातून मिळणार आहे.


आज समाजामध्ये धर्माचं, जातीपातीचं जे काय राजकारण खेळलं जातं त्यामुळे अनेकांचे नुकसान झालं आहे. काही लोक धर्माचा-जातीचा वैयक्तिक फायद्यासाठी कसा वापर करून घेतात. या गोष्टीवर ‘लग्न मुबारक’ हटके प्रेमकथेद्वारे भाष्य करतो. तसेच या सिनेमाला साई — पियुष यांचे संगीत असून त्यांनी संगीतबद्ध केलेले आदर्श शिंदेच्या आवाजातील ‘वन्स मोर लाव’ या गीताला तरूणाईने डोक्यावर घेतले आहे. तसेच ट्रॉय अरिफ यांनी संगीत दिलेले एक रोमँटिक गाणे ऐकायला मिळणार आहे. ‘लग्न मुबारक’साठी अक्षय कर्डक यांनी गीतलेखन केले आहे.


चेतन चावडा आणि सागर पाठक लिखित आणि दिग्दर्शित ‘लग्न मुबारक’ मधून प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव अभिनयात पदार्पण करत आहेत, या चित्रपटात प्रार्थना बेहरे, संस्कृती बालगुडे, आस्ताद काळे, सिद्धांत मुळे, प्रवीण तरडे, मिलिंद दास्ताने, रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, वंदना वाकनीस, अमरनाथ खराडे, पार्थ घाटगे, चेतन चावडा अशी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.


‘लग्न मुबारक’ या सिनेमाची निर्मिती गौरी पाठक यांची असून अभय पाठक आणि अजिंक्य जाधव प्रस्तुतकर्ते, तर सुमित अगरवाल, राहुल सोनटक्के, मछिंद्र धुमाळ, सुरज चव्हाण आणि जयेश दळवी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे छायांकन भूषण वाणी यांनी केले आहे.


Originally published at Marathi PR.

टायगर श्रॉफ आला गावठी सिनेमाच्या ट्रेलर लाँचला


दोस्ती-यारी एक तरफ और व्यापार-व्यवहार दुसरी तरफ…..असा एक व्यावहारीक दृष्टीकोन ठेवून मैत्री टिकवणारे अनेकजण असतात. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफने मैत्रीचा एक वेगळाच वस्तुपाठ सिनेविश्वासाठी घालून दिला आहे. केवळ बॉलीवूडच नाही तर अवघ्या सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकार स्वत:च्या सिनेमाच्या प्रमोशनच्या बाबतीत कमालीचा सजग असतो. पण बॉलीवूड स्टार टायगर श्रॉफ ३० मार्च रोजी येणाऱ्या स्वत:च्या बाघी-२ या सिनेमाच्या ऐवजी त्याच तारखेला प्रदर्शित होणाऱ्या एका मराठी सिनेमाचे प्रमोशन करतोय, तेही मैत्री खातर.


येत्या ३० मार्चला टायगर श्रॉफचा बहुचर्चित बाघी-२ आणि मराठीत आर.बी. प्रोडक्शन निर्मित गावठी हा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. खरंतर दोन्ही भिन्न भाषेतील आणि प्रकाराचे चित्रपट असले तरी एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या ह्या चित्रपटांमध्ये महाराष्ट्रात तरी सिनेमागृह आणि प्रेक्षक मिळविण्यासाठी स्पर्धा नक्कीच आहे. गावठी या सिनेमाचा दिग्दर्शक आनंद कुमार उर्फ ॲण्डी हा प्रसिद्ध सिने तसेच नृत्य दिग्दर्शक रेमो डीसोजा यांचा सहायक. फ्लाईंग जाट ह्या रेमो डिसोजा दिग्दर्शित आणि टायगर श्रॉफ अभिनित चित्रपटाच्या शुटींग दरम्यान टायगरला डान्सस्टेप तसेच सीन समजावून सांगण्याचे काम अर्थातच आनंदकुमार उर्फ ॲण्डी यांचे होते. ॲण्डीचा डान्स आणि दुवे हेरून शिकविण्याच्या पद्धतीवर टायगर खुश होता. त्यात ॲण्डीचा शांत, संयमी, मितभाषी आणि विनम्र स्वभावामुळे टायगर आणि ॲण्डीची चांगली गट्टी जमली. फ्लाईंग जाट येऊन गेला पण टायगरने ॲण्डीशी मैत्री कायम ठेवली. ॲण्डीने एक मराठी फिल्म दिग्दर्शित केली आहे आणि ती उत्तम झाल्याचे टायगरला रेमो डिसोजाकडून समजले तेव्हा त्याने फोन करून ॲण्डीचे अभिनंदन केले.


गुरूस्थानी असलेल्या रेमो डिसोजा सरांच्या हस्ते पहिले गाणे प्रकाशित झाल्यानंतर टायगरच्या हस्ते आपल्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच आणि दुसरे ‘भन्नाट’ हे गाणे प्रकाशित व्हावे, अशी ॲण्डीची मनोमन इच्छा होती. परंतु, गावठी आणि बाघी-२ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्याने आता टायगर आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी येणार नाही, हे मनाशी धरून दिग्दर्शक आनंदकुमार उर्फ ॲण्डीने टायगरकडे कधी विचारणा केली नाही. परंतु, टायगरने एखादे ट्वीट किंवा शुभेच्छा देण्यासाठी व्हिडीयो अपलोड करावा, या हेतूने ॲण्डीने टायगरला एक फोन केला. बोलण्याच्या ओघात ॲण्डीने त्याच्या मनातील खरी इच्छा टायगरला सहज बोलून दाखवली. तेव्हा टायगरने ट्रेलर आणि दुसरे गाणे लाँच करण्यासाठी लगेच होकार दिला, इतकेच नाही तर तारीख आणि वेळही सांगितली. आणि 6 मार्च रोजी मुंबईत एका भव्यदिव्य सोहळ्यात टायगर श्रॉफ आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांच्या हस्ते गावठी या चित्रपटाच्या ट्रेलर आणि दुसर्या गाण्याचे संगीत प्रकाशीत झाले. इतकेच नव्हे तर टायगर ने आणि बॉस्को ‘भन्नाट’ या ध़डाकेबाज आयटम साँगवर ॲण्डीसोबत मनसोक्त थिरकले.


“फ्लाईंग जाट या माझ्या चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान ॲण्डीसरांकडून मला जे काही मिळालं, त्याने माझी कला अधिक बहरली, असं मी मानतो. ॲण्डी सरांचा डान्स हा चमकणाऱ्या वीजेप्रमाणे आहे त्यामुळे मला त्यांच्यासमोर आता नाचताना थोडं दडपण आलं होतं. अतिशय कल्पक आणि मेहनती माणूस आहे. त्यामुळे त्यांनी दिग्दर्शित केलेला गावठी हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा असेल, याची मला खात्री आहे. ट्रेलर आणि गाणं पाहून चित्रपटाबद्दल मलाचं जास्त उत्सुकता लागलीय. माझा बाघी-२ आणि गावठी एकाच दिवशी प्रदर्शित होत असले तरीही मी गावठी नक्कीच पाहिन!” अशा भावना टायगर श्रॉफ याने याप्रसंगी व्यक्त केल्या. या सोहळ्याला येऊन टायगर श्रॉफ याने समस्त नृत्यकलाकारांचा सन्मान कला आहे. अशा शब्दात नृत्य दिग्दर्शक बॉस्को यांनी टायगरचे आभार मानताना ॲण्डी आणि गावठीच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.


टायगरने निभावलेली मैत्री आणि व्यक्त केलेल्या प्रेमामुळे दिग्दर्शक आनंदकुमार उर्फ ॲण्डी यांच्यासह गावठीची संपूर्ण टीम भारावून गेली. दिलदार टायगर श्रॉफच्या स्वभावाचा हा पैलू मतलबी आणि कृत्रीम वागणाऱ्यांच्या डोळ्यात नक्कीच अंजन घालणारा आहे.

गावठी ह्या चित्रपटाच्या रंगारंग सोहळ्याला टायगर श्रॉफ सोबत प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक बॉस्को मार्टिस, डॉ. पी. अनबलगन — आय.ए.एस, कथा लेखक व निर्माते सिवाकुमार रामचंद्रन त्याचबरोबर चित्रपटातील मुख्य कलाकार श्रीकांत पाटील व योगिता चव्हाण तसेच संदीप गायकवाड, गौरव शिंदे उपस्थित होते. संगीतकार अश्विन भंडारे तसेच श्रेयश यांच्या सोबत चित्रपटाच्या प्रस्तुतीसाठी पुढाकार घेणारे कासम अली, समीर दिक्षीत आणि ऋषिकेश भिरंगी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गावठी हा शब्द अपमान नाही तर अभिमान वाटावा, असा आत्मविश्वास प्रत्येकाला निखळ मनोरंजनाच्या माध्यमातून देणारा, आर. बी. प्रोडक्शन निर्मित ‘गावठी’ हा चित्रपट ३० मार्च रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होत आहे.


Originally published at Marathi PR.

‘गुलाबजाम’ येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला

“अन्न हे पूर्णब्रम्ह” हे ब्रीदवाक्य मनापासून जपणारा आपला महाराष्ट्र म्हणजे खाद्य पदार्थांचे माहेरघरच; आणि जेवणाची पंगत म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते रुचकर पदार्थांनी सजलेलं ताट. आपल्या संस्कृतीत स्वयंपाक नुसते रोजचे काम नाही तर माणसाने माणसाशी नाते जोडायचा तो एक सुंदर आणि महत्वाचा मार्ग आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘ये रे ये रे पैसा’ सारखा सुपरहिट चित्रपट देऊन रसिकप्रेक्षकांचे खुसखुशीत मनोरंजन करणाऱ्या गोल्डन गेट मोशन पिक्चर्स व झी स्टुडिओज् प्रस्तुत आणि सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गुलाबजाम’ चा गोडवा येत्या १६ फेब्रुवारीला प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ह्या चित्रपटात सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका असून या चित्रपटाच्या निमित्ताने हे दोन्ही कलाकार प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. नुकताच ह्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पंचतारांकित हॉटेल मध्ये पार पडला. ह्या सोहळ्याला चित्रपटातील सर्व कलाकार, झी स्टुडिओज्चे मंगेश कुलकर्णी, निर्माते विनोद मलगेवार उपस्थित होते.


चित्रपटाची कथा आहे लंडनमध्ये नोकरी करणाऱ्या आदित्यची आणि पुण्यात डबे बनवून देणाऱ्या राधाची. लंडनमध्ये मराठी पदार्थ मिळणारे रेस्टॉरंट काढायचे आदित्यचे स्वप्न आहे. आदित्य आपली लंडनमधील नोकरी सोडून मराठी पारंपारिक जेवण शिकण्याच्या हेतूने पुण्यात येऊन दाखल होतो. पुण्यात राहणाऱ्या आणि लोकांना जेवणाचे डबे बनवून देणाऱ्या राधा आगरकरचा आदित्यला शोध लागतो. सुगरण राधाचा शिष्य होणे ही सोपी गोष्ट नाही, हे आदित्यला कळून चुकते. ह्या प्रवासात दोघांनाही एकमेकांची मने आणि भूतकाळातील प्रसंग समजतात आणि माणूस म्हणून ते दोघे एकत्र स्वयंपाक करताना समृद्ध होत जातात.

झी स्टुडिओज् ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती गोल्डन गेट मोशन पिक्चर यांचे विनोद मलगेवार आणि विशाल चोरडिया यांनी केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर आणि तेजस मोडक यांचे असून, दिग्दर्शन सचिन कुंडलकर यांचे आहे. चित्रपटाचं संकलन केलंय सुचित्रा साठे यांनी तसेच नयनरम्य छायाचित्रण केलंय छायालेखक मिलिंद जोग यांनी. पूर्वा पंडित यांचे कला दिग्दर्शन असून फूड स्टायलिंगची जबाबदारी पेलली आहे सायली राज्याध्यक्ष आणि श्वेता बापट यांची. चित्रपटाला देबार्पितो साहा यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात ‘मन खमंग’ असे गाणे असून ते संगीतबद्ध केले आहे थायकुड्डम ब्रिज यांनी. हे गाणं लिहिलंय तेजस मोडक यांनी तर स्वरबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी. चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर, महेश घाग, मधुरा देशपांडे, चिन्मय उदगीरकर आणि मोहनाबाई हे कलाकार आहेत.


येत्या १६ फेब्रुवारीला मनातली चव पदार्थांमध्ये उतरवणाऱ्या सगळ्यांची आणि सगळ्यांसाठीची गोष्ट गोल्डन गेट मोशन पिक्चर्स व झी स्टुडिओज् रसिक प्रेक्षकांना बहाल करणार आहे आणि ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.


Originally published at Marathi PR.

‘आम्ही दोघी’साठी मुक्ता बर्वे शिकली विणकाम

चित्रपटातील भूमिका वस्तुदर्श आणि स्वाभाविक वाटावी म्हणून आज कलाकार कितीही मेहनत करायला व त्यासाठी कितीही वेळ द्यायला तयार असतात. असाच एक अलिकडील अनुभव म्हणजे मुक्ता बर्वे ने ‘आम्ही दोघी’साठी केलेली तयारी म्हणजे या चित्रपटासाठी ती चक्क विणकाम शिकली आहे. चित्रपटाची कथा दोन स्त्रीयांच्या स्वभाव वैशिष्ट्यावर आणि त्यांच्या नात्यावर बेतली आहे. यातील अमला नावाच्या मुक्ताच्या व्यक्तिरेखेसाठी विणकाम शिकणे गरजेचे होते. मुक्ताने ते अल्पावधीतच शिकून घेतले आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्या या व्यक्तिरेखेसाठी उठवला.

स्त्रीसशक्तीकरणाचा एक आगळा वस्तुपाठ या व्यक्तिरेखेतून रसिकांना अनुभवायला मिळेलच, पण त्याचबरोबर रसिकांसमोर येईल ती या चित्रपटातील अभिनेत्रींनी घेतलेली मेहनत आणि त्यातून दिसलेली त्यांची प्रतिभा. नावाप्रमानेच ही दोघींची कथा… त्यांच्या वाटा वेगळ्या पण मार्ग एकच… विचार वेगळे पण आवड एकच… त्या वेगळ्या, पण तरीही एकच… ही कथा आहे अमला आणि सावित्री सरदेसाई या दोघींची.

चित्रपट आणि रंगभूमीवरील आपल्या कसदार अभिनयाने आपले वेगळे असे स्थान निर्माण केलेल्या मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांच्या या आगामी मराठी चित्रपटात वेगळ्या भूमिका आहेत. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण आणि निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारी २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अभिनेत्री, कॉस्चुम डीझायनर व सह-दिग्दर्शक म्हणून चित्रपट रसिकांना माहित असलेल्या प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शनीय पदार्पण ‘आम्ही दोघी’मधून होत आहे. तसेचया चित्रपटाची पटकथा प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांची आहे आणि संवाद भाग्यश्री जाधव यांनी केले आहे.

“मुक्ता आणि प्रिया या मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि नावाजलेल्या कलाकार आहेत. दोघींनीही वैविध्यपूर्ण भूमिका करत स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या तशाच वेगळ्या भूमिका असेलेला हा चित्रपट म्हणजे रसिकांसाठी एक मेजवानीच असणार आहे. मराठी रसिक म्हणूनच या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहेत,” असे उद्गार एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी काढले.

‘आम्ही दोघी’ ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप-मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. प्रत्येक व्यक्तीने फक्त स्वतःच्या दृष्टीकोनातून विचार न करता समोरच्याचा दृष्टिकोन सुद्धा ध्यानात घेतला पाहिजे ही बाब या चित्रपटात अधोरेखित होते. त्यामुळेच ती आजच्या प्रत्येक तरुणीला आपली गोष्ट वाटेल”, असे उद्गार दिग्दर्शक प्रतिमा जोशी यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना काढले.

येत्या २३ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘आम्ही दोघी’ या चित्रपटाच्या वेगळ्यापणामुळे चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.


Originally published at Marathi PR.

“आपला मानूस” ची टीम पुणेकरांच्या भेटीला


Viacom18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की ! हा चित्रपट एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार व त्यालाजोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे. आपला मानूस चित्रपटाच्या टीजरला १.५ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहे.


आपल्या मराठी चित्रपटाचा पायंडा नेहमी नातेसंबंधांचा आणि परस्पर एकमेकांसोबतची ताकद काय असते याबद्दलचा असतो. या चित्रपटामध्ये शहरात राहणाऱ्या आणि शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या राहुल आणि भक्ती गोखले या तरुण दांपत्याची कथा मांडली असून, या भूमिका साकारल्या आहेत, अनुक्रमे सुमित राघवन आणि ईरावती हर्षे यांनी. तसेच यात वडीलांबरोबरच्या नात्यातील गुंतागुंत सुध्दा दाखविलेली आहे. वडीलांच्या अनपेक्षित मृत्युमुळे त्यांच्या जीवनात मारुती नागरगोजे नावाच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचा प्रवेश होतो. ही भूमिका नाना पाटेकर यांनी साकारली आहे. मारुती नागरगोजे यांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे त्यांचे जग उलटेपालटे होते आणि त्यांच्या मनात जीवन व कुटुंबा विषयीच्या श्रध्दांवर प्रश्न उभे राहतात.


नाना पाटेकर म्हणाले,“नटसम्राट नंतर, मी काहीतरी विशेष माझ्याकडे येण्यासाठी वाट पहात होतो, एखादे असे पात्र जे ऐकल्यानंतर मी सोडणार नाही आणि मारुती नागरगोजे मध्ये मला ते सापडले. ते एक क्लिष्ट पात्र आहे, मराठी सिनेमामध्ये मी याआधी कधीच अशी भूमिका साकारली नाही. तो मितभाषी असून त्याचे हावभाव आणि त्याच्या बोलण्याच्या विशिष्ट लकबीमुळे हे पात्र विलक्षण बनले आहे.”

सतीश राजवाडे म्हणाले, हा एकच धाटणीवर आधारित सिनेमा नाही, स्टोरी टेलिंग चा वेगळा वापर करून हा सिनेमा लिहिला आहे यामुळे दर 15 मिनिटांनी वेगळा जॉनर यामध्ये तुम्हाला दिसेल. नाना पाटेकर यांच्या सोबत काम करताना अनुभव सुंदर होता, प्रत्येक बाबीसाठी नाना तयार असतात प्रत्येक वेळी त्यांचा वेगळा अप्रोच असतो, तिघेही कलाकार परफॉमर आहेत, परस्पर नातेसंबधावर हा सिनेमा बोलतो.

इरावती हर्षे म्हणाल्या, भूमिकेबद्दल सांगण्यापेक्षा तुम्ही सिनेमात बघा, मी स्वतः ला भाग्यशाली समजते नाना पाटेकर यांच्या सोबत काम करता आले, नानांचे काम प्रेरणा देणारे आहे, त्यांच्याकडून शिकायला मिळालं. नाटकावर आधारित असला तरी हा सिनेमा त्या नाटकापेक्षा वेगळा अनुभव प्रेक्षकांना देणारा आहे.


या सहकार्याबद्दल बोलताना Viacom18 मोशन पिक्चर्स मराठी आणि कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले, गेल्या पाच वर्षात मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यानेआपल्या नावीन्यपूर्ण कथाकथनाच्या आणि अनोख्या संकल्पनांनी अन्य कोणापेक्षाही अधिक प्रभाव टाकला आहे. ‘आपला मानूस’ ही 2018 मधील Viacom18 ची पहिली निर्मिती असेल. आपल्या प्रभावी अभिनय वसंवाद कौशल्यांमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू कलाकार नाना पाटेकर आणि जबरदस्त कथानकासह ‘आपला मानूस’संकटांशी झुंजणाऱ्या आणि आयुष्यात काहीतरीअनपेक्षितपणे अशुभ घडण्याच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबाचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न करेल. हा एक विवेकी चित्रपट असून प्रेक्षकांना तो भावेल, याची मला खात्री आहे.

Viacom18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत “आपला मानूस” या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण फिल्मस, वॉटरगेट प्रॉडक्शन्स आणि श्री गजानन चित्र यांनी केली असून सतीश राजवाडे दिग्दर्शित हा चित्रपट ९ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे.


Originally published at Marathi PR.

बहुचर्चित, रहस्यमय ‘राक्षस’चा टीजर लाँच


‘जंगल ना गाणं कधी ऐकलंय का?’ असा प्रश्न विचारत गूढ अशा आगामी ‘राक्षस’ या मराठी चित्रपटाचा जबरदस्त, उत्कंठावर्धक टीजर आज लाँच करण्यात आला आहे. ‘नवलखा आर्टस् अँड होली बेसिल कम्बाइन’ चे विवेक कजारिया आणि निलेश नवलखा निर्मित, समित कक्कड यांची ‘समित कक्कड फिल्म्स’ प्रस्तुत आणि ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित ‘राक्षस’ ने आपल्या हटके अशा नावामुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली होती ती आता या टीजर मुळे आणखी वाढली आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अभिनेता शरद केळकर ही जोडी ‘राक्षस’च्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र बघायला मिळणार आहे. या टीजर मधून ‘राक्षस’ ही आदिवासी, जंगल या भोवती फिरणारी कथा असल्याचे दिसते. आदिवासी पाड्यावर बालपण गेलेल्या ज्ञानेश झोटिंग यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. “जंगल गाणं गातं, ते हसतं — रडतं त्याला भावना असतात” असे यात म्हटले आहे तर दुसरीकडे एक मुलगी आपल्या आईला म्हणतेय ‘आई, बाबांना जंगलातल्या राक्षसाने गिळलंय’. या संवादामुळे गूढ वाढलेल्या ‘राक्षस’ मध्ये नक्की काय रहस्य दडलेले आहे हे जाणून घेण्याची प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे.


दरम्यान, ‘राक्षस’ चित्रपटात शरद केळकर, साई ताम्हणकर यांच्या बरोबरच ऋजुता देशपांडे, दयाशंकर पांड्ये, विजय मौर्य, याकूब सैद, पूर्णानंद वांदेकर आदींच्या भूमिका आहेत.


घनदाट, किर्रर अशा जंगलात नक्की काय घडलं आहे? आणि या ‘राक्षस’ मध्ये नेमकं काय रहस्य आहे? हे येत्या २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना कळणार आहे.


Originally published at Marathi PR.